विरोधी पक्षांनी शेतकर्‍यांची दिशाभूल करू नका!

विरोधी पक्षांनी शेतकर्‍यांची दिशाभूल करू नका!

पंतप्रधान नरेंद्र मोदी

मी सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती करतो, शेतकर्‍यांची दिशाभूल करू नका. नव्या कृषी कायद्यांचे श्रेय तुमच्या सगळ्या जुन्या निवडणूक जाहीरनाम्यांना देतो. मला शेतकर्‍यांचे कष्ट कमी करायचे आहेत. मला त्यांची प्रगती करायची आहे. कृषी क्षेत्रात आधुनिकता आणायची आहे. नवे कृषी कायदे एका रात्रीत तयार झाले नाहीत. जे काम खरंतर २५ वर्षांपूर्वी व्हायला हवे होते ते आम्हाला आज पूर्ण करावे लागत आहे. त्यावर आम्ही गेल्या दोन दशकांपासून केंद्र, राज्य सरकार आणि संघटना चर्चा करत आहेत. आम्ही फक्त गेल्या अनेक वर्षांपासून स्थगित असलेल्या शेतकर्‍यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे काम करत आहोत, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना लगावला.

मध्य प्रदेशमध्ये किसान महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,मागील अनेक दिवसांपासून शेतकर्‍यांसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यांवर चर्चा सुरू आहे. कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणणारे हे कायदे एका रात्रीत तयार करण्यात आले नाहीत. मागील २०-२२ वर्षांपासून सत्तेत असलेल्या प्रत्येक सरकारनं यावर समग्रपणे चर्चा केली आहे, असे मोदी म्हणाले.

मी सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती करतो. याचे सगळे श्रेय तुम्ही घ्या. याचे सर्व श्रेय तुमच्या सगळ्या जुन्या निवडणूक जाहीरनाम्यांना देतो. मला शेतकर्‍यांचे कष्ट कमी करायचे आहेत. मला त्यांची प्रगती करायची आहे. कृषी क्षेत्रात आधुनिकता आणायची आहे, असे म्हणत मोदी यांनी सर्व पक्षांना आवाहन केले.

आज देशातील सर्वच राजकीय पक्षांचे जुने जाहीरनामे बघितले. त्यांची जुनी भाषणे ऐकली. जे कृषि मंत्रालय सांभाळत होते, त्यांची पत्र वाचली तर आज कृषी क्षेत्रात जे बदल करण्यात आले आहेत. ते वेगळे नाहीत. आमचे सरकार शेतकरी समर्पित असून, आम्ही फाईलींच्या ढिगार्‍यात फेकण्यात आलेल्या स्वामीनाथन आयोगाचा अहवाल बाहेर काढला आणि शिफारशी लागू केल्या. हमीभावात दीड टक्क्यांनी वाढ केली, असे म्हणत मोदी यांनी विरोधकांवर शरसंधान साधले.

First Published on: December 19, 2020 6:52 AM
Exit mobile version