मतदान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली प्रतिक्रिया, निवडणूक आयोगाचं कौतुक करत म्हणाले…

मतदान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली प्रतिक्रिया, निवडणूक आयोगाचं कौतुक करत म्हणाले…

अहमदाबाद – नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) माध्यमांना सामोरे जात नाहीत अशी विरोधक टीका करत असतानाच आज त्यांनी पत्रकारांच्या गराड्यात येत माध्यमांशी थेट संवाद साधला. अहमदाबादमध्ये मतदान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांसमोर निवडणूक आयोगाच्या कार्याचं कौतुक केलं.

हेही वाचा – Gujrat Election 2022 : आज अखेरचा टप्पा; नरेंद्र मोदी, अमित शाह करणार मतदान

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील आज मतदान होत आहे. राणीप विधानसभा मतदारसंघासाठी निशान पब्लिक स्कूलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी ९.३० ते १० च्या दरम्यान मतदान केले. मतदानासाठी जाताना त्यांनी शाळेच्या वाटेवर उभ्या असलेल्या लोकांना अभिवादन केले. मतदान केंद्रावर रांग होती. या रांगेत उभे राहून आपल्या क्रमांक आल्यानंतरच मतदान केलं. त्यानंतर, मतदान कक्षाच्या बाहेर येत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या नियोजनाचं प्रचंड कौतुक केलं.

‘मी तुम्हा सर्वांना मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद देतो. निवडणूक आयोगालाही मनापासून खूप शुभेच्छा. त्यांनी अत्यंत व्यवस्थितपणे संपूर्ण जगात भारतातील लोकशाहीची प्रतिष्ठा वाढेल अशाप्रकारे निवडणूकीचे संचालन करण्याचे नियोजन आखले आहे. त्याचा परिणाम गुजरातमध्ये दिसतच आहे. गुजरातमधील मतदारांचेही लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाल्यामुळे खूप अभिनंदन,’असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

हेही वाचा – देशातील 25 हायकोर्टांत दरवर्षी 7.5 लाख याचिका होतात दाखल, जनहित याचिकांचाही समावेश

निवडणूक आयोगाच्या सदस्य नियुक्तीवरून सर्वोच्च न्यायालायने नुकतेच निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले होते. असं असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाचं तोंडभरून कौतुक केल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ सालापासून आतापर्यंत एकदाच पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेतही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यामुळे, मोदी कधीच पत्रकार परिषद घेत नसून माध्यमांना सामोरे जात नाहीत, असा त्यांच्यावर आरोप करण्यात येत असतो. विरोधकांनी यावरून त्यांच्यावर नेहमीच टीका केली आहे. मात्र, असं असतानाच मोदींनी आज अचानक माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

First Published on: December 5, 2022 10:17 AM
Exit mobile version