पंतप्रधान मोदी चार वर्ष फ्लाईट मोडवर

पंतप्रधान मोदी चार वर्ष फ्लाईट मोडवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह

इंग्रजीमध्ये ग्लोबट्रोटर (Globetrotter) असा शब्द आहे. याचा अर्थ ‘देशोदेशी वारंवार प्रवास करणारा प्रवासी’. भारताचे १४ वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा शब्द तंतोतंत लागू व्हावा, अशी भरारी त्यांनी घेतली आहे. युपीएकडून भारताचे दोनवेळा पंतप्रधान असलेले डॉ. मनमोहन सिंग यांच्या मितभाषी वृत्तीला ‘सायलेंट मोड’वर असलेला पंतप्रधान म्हणूण सोशल मीडियावर म्हटले गेले. भाजपच्या सत्ता स्थापनेला आज चार वर्ष पूर्ण होत आहेत. या चार वर्षात मोदींजीच्या परदेश दौऱ्याचा वेग आणि आकडे पाहता, आता लोक त्यांना ‘फ्लाईट मोड’वर असलेले पंतप्रधान म्हणू लागले आहेत.

पहिल्या तीन वर्षातील आजी-माजी पंतप्रधानांचे दौरे

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पदावर असताना मे २०१८ पर्यंतचे दौरे

डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान पदाच्या पहिल्या तीन वर्षांत २७ देशांना भेटी दिल्या होत्या. तर दुसऱ्या टर्ममध्ये सिंग यांनी ३६ देशांना भेटी दिल्या होत्या. तर पंतप्रधान मोदींचे पहिल्या चार वर्षात ४० दौरे झाले असून त्यांनी तब्बल ४९ देशांना भेटी दिलेल्या आहेत. यामध्ये अमेरिका, युरोप, युएई, आशिया खंडातील काही देशांना त्यांनी वारंवार भेटी दिलेल्या आहेत. ज्याची संख्या आता ९४ वर गेली असल्याचे वृत्त द हिंदू या दैनिकाने दिले आहे.

मोदींजीच्या दौऱ्याचा खर्च किती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर झालेला खर्च

१५ जून २०१४ ते जानेवारी २०१८ पर्यंत मोदींनी केलेल्या दौऱ्याचा खर्च आहे ३७७ कोटी ६७ लाख १७ हजार ४६५. खर्चाची अधिकृत आकडेवारी पंतप्रधान कार्यालयाने वेबसाईटवर टाकलेली आहे. फेब्रुवारी ते मे दरम्यान केलेल्या दौऱ्यांचा खर्च अजून यायचा आहे.

मोदींच्या परदेश दौऱ्याचे फलित

सत्तेत येण्यापूर्वी मोदींनी काळा पैसा भारतात आणू, परकीय गुंतवणूक आणू, रोजगार वाढवू असे अनेक आश्वासने दिली होती. काळा पैसा, गुंतवणूक, रोजगार गेला कुठे? असे प्रश्न विरोधक आणि जनता मोदींना आता विचारत आहे. नुकतंच मोदीजी नेपाळ दौऱ्याहून परत आले. नेपाळमध्ये अनेक मंदिरांना त्यांनी भेटी दिल्या. पवित्र पाणी डोक्यावर शिंपडले. हा धार्मिक दौरा असल्याची टीका काँग्रेसने केली. मोदींच्या याधीचेही दौरे अशाच काही कारणांमुळे प्रसिद्धिझोतात आले होते. अर्थशास्त्रज्ञांच्या मतानुसार मोदींचा प्रत्येक परदेश दौरा हा काही आपल्याला तात्काळ फायदा मिळवून देईल असे नाही. काही दौऱ्याचे फलित हे विशिष्ट कालावधीनंतर दिसते.

आजी माजी पंतप्रधानांची दौऱ्यावरून तुलना

पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर मोदींनी न्यूयॉर्क शहरातील मॅडिसन स्क्वेअरवर हजारो भारतीयांसमोर भारत-अमेरिकेदरम्यानचे संबंध यशस्वी करण्यासाठी जोरदार भाषण केले होते. त्या भाषणाचे त्यावेळी कौतुकही झाले होते. मात्र त्यांच्या भाषणातील अनेक मुद्दे ही त्यांच्याही आधी डॉ. मनमोहन सिंग यांनी त्याच मॅडिसन स्क्वेअरवर सांगितले होते.

क्वार्टझ न्यूज वेबसाईटनुसार, मोदींनी अल्पकालावधीत आशिया खंडातील देशांमध्ये मजबूत संबंध निर्माण केले आहेत. ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरीया, थायलंड, मान्यमार, व्हिएतनाम आणि फिजी या देशांचे अतिशय कमी कालावधीत दौरे पुर्ण केले आहेत. पंतप्रधानांना आता मध्य आशियातील देशांसोबत संबंधदृढ करण्याचे ध्येय आहे. सौदी अरेबिया, युएई, कतार या देशांमधून परकिय गुंतवणूक वाढावी, यासाठी मोदींचा प्रयत्न असणार आहे. पण यामध्ये मोदी किती यशस्वी होतात हे येणाऱ्या काळातच कळेल.

First Published on: May 26, 2018 12:09 PM
Exit mobile version