येत्या काळात 40 हजार कोटींच्या संरक्षण निर्यात करण्याचे उद्दिष्ट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

येत्या काळात 40 हजार कोटींच्या संरक्षण निर्यात करण्याचे उद्दिष्ट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : देशाची संरक्षण निर्यात गेल्या पाच वर्षांत आठ पटीने वाढली आहे. आपण जगभरातल्या 75हून जास्त देशांना आता संरक्षण सामग्री आणि उपकरणांची निर्यात करत आहोत. भारताची संरक्षण निर्यात 2021-22 या वर्षांत एक अब्ज 59 कोटी अमेरिकी डॉलर्सपर्यंत म्हणजेच 13 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे आणि येणाऱ्या काळात पाच अब्ज डॉलर्स म्हणजेच 40 हजार कोटी रुपयांची संरक्षण निर्यात करण्याचे उद्दिष्ट आपण ठेवले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर परिषद आणि प्रदर्शन केंद्रात डेफएक्स्पो 2022 या संरक्षणविषयक प्रदर्शनाचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी कार्यक्रमादरम्यान, मिशन डेफस्पेसचा शुभारंभ केला आणि गुजरातमधील डीसा हवाईक्षेत्राची पायाभरणी केली. अमृत काळात नवीन भारताच्या संकल्पांचे आणि त्याच्या क्षमतांचे चित्र यात साकारले जात आहे असा डेफएक्स्पो 2022चा उल्लेख पंतप्रधानांनी केला.

फक्त भारतीय कंपन्याचाच सहभाग आणि केवळ मेड इन इंडिया उपकरणे असलेले हे पहिलेच संरक्षण प्रदर्शन आहे, असे सांगतानाच पंतप्रधान म्हणाले की, लोहपुरुष सरदार पटेल यांच्या भूमीतून आम्ही भारताच्या सक्षमतेचे उदाहरण जगासमोर ठेवत आहोत. प्रदर्शनात 1300हून अधिक प्रदर्शक सहभागी झाले आहेत. यात भारतीय संरक्षण उद्योग आणि या उद्योगाशी संबंधित काही संयुक्त उपक्रम, एमएसएमई आणि 100हून अधिक स्टार्टअपचा समावेश आहे. हे प्रदर्शन एकाच नजरेत भारताची क्षमता आणि त्यात दडलेल्या संधींची झलक देते. यानिमित्ताने पहिल्यांदाच 400हून अधिक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

साठपेक्षा अधिक विकसनशील देशांबरोबर भारत आपले अवकाश विज्ञान सामायिक करत आहे. दक्षिण आशिया उपग्रह हे याचे प्रभावी उदाहरण आहे. पुढील वर्षापर्यंत, दहा आसियान देशांनाही भारताचा उपग्रह डेटा वास्तव वेळेत उपलब्ध होईल. अगदी युरोप आणि अमेरिकेसारखे विकसित देशही आपला उपग्रह डेटा वापरत आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

‘पाथ टू प्राइड’ ही केवळ डेफएक्सपो 2022ची संकल्पना नाही, तर मजबूत आणि ‘आत्मनिर्भर’ असलेल्या ‘नवभारताचे’ नवीन उद्दिष्ट आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात सांगितले. ‘अमृत काळा’च्या सुरुवातीला डेफएक्स्पो 2022चे आयोजन सर्व धोक्यांपासून देशाचे रक्षण करण्याचा आणि येत्या 25 वर्षांत भारताला संरक्षण क्षेत्रातील जागतिक उत्पादन केंद्र म्हणून रुपांतरित करण्याच्या सरकारच्या दृढ संकल्पाचे प्रतिबिंब आहे. डेफएक्स्पो हे महत्त्वाकांक्षी आणि आत्मनिर्भर भारताचे प्रतीक आहे. ते भारताच्या अभिमानाचे, सामर्थ्याचे आणि संकल्पाचे प्रतीक आहे, असे ते म्हणाले.

First Published on: October 19, 2022 10:48 PM
Exit mobile version