पंतप्रधानपदी मोदींच्या नावावर होणार शिक्कामोर्तब

पंतप्रधानपदी मोदींच्या नावावर होणार शिक्कामोर्तब

सौजन्य - ANI

बहुमताचा आकडा पार केलेल्या भाजपने शनिवारी आपल्या मित्रपक्षांच्या एनडीए नेत्यांची बैठक शनिवारी बोलावली आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळ रचनेची महत्वपूर्ण चर्चा होणार आहे. या आणि भाजप खासदारांच्या बैठकीत पंतप्रधानपदी नरेंद मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या एनडीए बैठकीला आमंत्रित करण्यात आले असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्वतः मातोश्रीवर फोन करून उद्धव यांना बैठकीचे आमंत्रण दिले.

भाजपनेही आपल्या सर्व खासदारांना शनिवारी दिल्लीला बोलावले असून सर्व 303 खासदार या बैठकीला हजर राहणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस भाजपच्या महाराष्ट्रातील सर्व 23 खासदारांसह दिल्लीकडे रवाना होणार आहेत. भाजपच्या सर्व खासदारांसाठी संसदेचा सेंट्रल हॉल दोन दिवस म्हणजे शनिवार आणि रविवारसाठी बुक करण्यात आला आहे. भाजप खासदारांच्या बैठकीत मोदी यांचे नाव पंतप्रधान म्हणून निश्चित झाल्यावर तसे पत्र एनडीए मित्र पक्षांना दिले जाईल. हे पत्र घेऊन मोदी नेत्यांसोबत राष्ट्रपतींकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा करतील. यावेळी एनडीएचे नेतेही सोबत असणार आहेत. संविधानानुसार बहुमत असलेल्या नेत्याला राष्ट्रपती सरकार बनवण्याचे निमंत्रण देतात आणि त्यानंतर शपथ विधीची प्रक्रिया सुरू होईल.

शिवसेनेला 2 कॅबिनेट, 1 राज्यमंत्रीपद मिळण्याची आशा

मोदी सरकार 2 च्या मंत्रिमंडळात शिवसेनेला 2 कॅबिनेट आणि 1 राज्य मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपप्रणित एनडीएमध्ये सध्या शिवसेना हा 18 खासदारांसह दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. विशेष म्हणजे सध्या मोदी आणि शहा यांचे उद्धव यांच्याशी असलेले मधूर संबंध पाहता तीन मंत्रीपदे शिवसेनेला मिळण्यास काही अडचण असेल असे दिसत नाही. मागच्या पाच वर्षात मोदी-शहा आणि उद्धव यांचे विळ्या भोपळ्याचे नाते झाले होते. यामुळे एका कॅबिनेट आणि ते सुद्धा अवजड खात्यासारख्या फार महत्व नसलेल्या एकमेव खात्यावर त्यांना मूग गिळून बसावे लागले होते. यावेळी मात्र तसे होणार नाही. महत्वाची तीन मंत्रीपदे मिळतील, असे बोलले जाते.

कॅबिनेट मंत्रीपदे मिळवण्यासाठी शिवसेनेच्या खासदारांनी लॉबिंग सुरू केले असून सूत्रांच्या माहितीनुसार 8 खासदार मंत्रीपदासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसुळ, अनंत गीते हे ज्येष्ठ खासदार पराभूत झाल्याने निवडून आलेल्या 18 पैकी 8 खासदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांचे मंत्रिपद निश्चित समजले जात आहे. उरलेल्या दोन मंत्रीपदांसाठी 7 जणांमध्ये अरविंद सावंत, विनायक राऊत आणि गजानन कीर्तिकर तसेच राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या नावाची चर्चा आहे.

First Published on: May 25, 2019 5:55 AM
Exit mobile version