चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम

चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम

भारत हा शांतीपूर्ण देश आहे. आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. भारताने कधीच कोणावर आक्रमण केलेले नाही. आम्ही चोख प्रत्युत्तर देण्यात सक्षम आहोत. शहीद झालेल्या जवानांनाही अभिमान असेल की, त्यांना संघर्षात वीरमरण आले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी यांनी बुधवारी देशातील मुख्यमंत्र्यांशी बोलण्यापूर्वी जनतेशी संवाद साधला होता. मोदींनी शहिदांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजलीही अर्पण केली. आम्ही नेहमीच शेजार्‍यांबरोबर को-ऑपरेटिव्ह आणि फ्रेंडली पद्धतीने काम केले आहे. नेहमीच त्यांच्या विकास आणि कल्याणाची इच्छा केली आहे. जिथे मतभेद असतील तेसुद्धा आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.

जेणेकरून मतभेद राहू नयेत. मतभेद वादामध्ये बदलू नये. आम्ही कधीच कोणाला उकसवले नाही. तसेच आम्ही देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड करणार नाही. जेव्हा कधी वेळ आली तेव्हा आम्ही देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्यासाठी शक्तीचे प्रदर्शन केले आहे. आपले जवान मारता मारता शहीद झाले आहेत याचा देशाला अभिमान आहे. आमच्या क्षमता वेळोवेळी आम्ही सिद्ध केलेल्या आहेत. त्याग हे आमच्या राष्ट्रीय चारित्र्याचा भाग आहे. त्याचबरोबर विक्रम आणि वीरतासुद्धा आमच्या देशाच्या चारित्र्याचा भाग आहे, असेही मोदी म्हणाले आहेत. दरम्यान, भारत-चीन सीमेवर हौतात्म्य आलेल्या आपल्या 20 जवानांची नावे आज जाहीर करण्यात आली आहेत.

चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत या जवानांना हौतात्म्य आले आहे. ही घटना 15-16 जूनदरम्यानच्या रात्री घडली होती. भारतीय सैनिकांचे पथक कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्वात चिनी कॅम्पमध्ये गेले होते. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे शस्त्र नव्हते. हे पथक चिनी सैन्याच्या मागे हटण्याच्या मुद्यावर झालेल्या सहमतीसंदर्भात बोलणी करण्यासाठी गेले होते. मात्र, तेथे भारतीय जवानांना चिनी सैनिकांनी दगा दिला. दगड, काटेरी तारा आणि खिळे असलेल्या काठ्यांनी चिनी सैनिकांनी या पथकावर हल्ला केला. यात कमांडिग ऑफिसर कर्नल संतोष बाबू आणि दोन जवान तेथेच शहीद झाले.

जशास तसे उत्तर द्या; लष्कराला दिले सर्वाधिकार
लडाखच्या गलवान खोर्‍यात एलएसीवर भारत-चीन सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनच्या ४३ सैनिकांना ठार करण्यात आलेले आहे. त्यानंतर चीनच्या आक्रमक कारवाईला जशास तसे उत्तर देण्यासाठी मोदी सरकारनेही लष्कराला सर्वाधिकार देण्यात आले आहेत. वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) कोणत्याही चिनी आक्रमणाविरोधात लढण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण स्वातंत्र्याचे आपत्कालीन अधिकार देण्यात आले आहेत. सोमवारी रात्री झालेल्या हिंसक संघर्षानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.ज्या ठिकाणी संघर्ष झाला, त्या गलवान खोर्‍यात भारतीय लष्कराला चीनविरोधातील कारवाईसाठी मोकळीक देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे याच भागात चीनच्या पीएलएने युद्धसराव केला आहे. भारतीय लष्कर आणि चिनी सैन्य गेल्या महिन्याभरापासून लडाखच्या सीमेवर एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. चीन वारंवार भारताच्या भूमीत घुसखोरी करत असून, भारतीय जवानही त्याला वेळोवेळी रोखत असल्याने चकमक उडत आहे.

शहीद झालेले २० जवान
कर्नल संतोष बाबू (हैदराबाद), नंदुराम सोरेन (मयुरभंज), मनदीप सिंग (पटियाला), सतनाम सिंग (गुरुदासपूर), हवालदार के पालानी (मदुराई), हवालदार सुनील कुमार (पटना), हवालदार बिपुल रॉय (मेरठ शहर), दिपक कुमार (रेवा), राजेश ओरंग (बिरघम), कुंदनकुमार ओझा (साहीबगंज), गणेश राम (कांकेर), चंद्रकांता प्रधान (कंधलमाल), अंकुश (हमीरपूर), गुरुबिंदर (संगरुर), गुरुतेज सिंग (मानसा), चंदन कुमार (भोजपूर), कुंदन कुमार (साहरसा), अमन कुमार (समस्तीपूर), जय किशोर सिंग(वैशाली),
गणेश हंसदा (पूर्व सिंगभूम)

First Published on: June 17, 2020 10:00 PM
Exit mobile version