‘त्यांनी माझा गळा दाबला’; प्रियंका गांधींचा खळबळजनक आरोप

‘त्यांनी माझा गळा दाबला’; प्रियंका गांधींचा खळबळजनक आरोप

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा

देशभरात सुरू असलेला नागरिकत्व कायदा विरोधी आंदोलनात आता काँग्रेसच्या उत्तर प्रदेशातील पूर्वांचलच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील उडी घेतली आहे. उत्तर प्रदेशच्या लखनौमधील एका वृद्ध आंदोलनकर्त्याला पोलिसांनी अटक केल्याच्या निषेधार्थ त्याच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी प्रियांका गांधी गेल्या असताना त्यांना पोलिसांनी अडवून त्यांचा गळा दाबल्याचा खळबळजनक आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे. या प्रकरणावरून आता मोठा वाद सुरू झाला असून काँग्रेसकडून CAA, NRC आणि NPR विरोध अधिकच तीव्र केला जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील माजी पोलीस अधिकारी एस. आर. दारापुरी यांनी त्यांच्या फेसबुकवर आंदोलनाचं समर्थन करणारी पोस्ट टाकली होती. या पोस्टवरून पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरातून अटक केली होती.

नक्की घडलं काय?

दारापुरी यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर प्रियंका गांधी यांना पत्रकारांनी झालेल्या प्रकाराविषयी विचारणा केल्यानंतर त्यांनी पत्रकारांना सगळा प्रकार सांगितला. ‘मी दारापुरी यांच्या कुटुंबियांना भेटायला आले होते. रस्त्यात अचानक पोलिसांची गाडी आमच्यापुढे थांबली. आम्हाला म्हणाले, तुम्ही जाऊ शकत नाही. त्यांनी आम्हाला अडवलं. कारणही सांगितलं नाही. मग मी गाडीतून उतरले आणि पायी चालायला लागले. मग त्यांनी मला घेरलं, माझा गळा दाबला. मला महिला पोलिसांनी धक्काबुक्की केली. मग मी माध्या एका कार्यकर्त्यासोबत बाईकवर निघाले, तेव्हा मला पुन्हा अडवलं. शेवटी कशीतरी मी यांना भेटायला पोहोचले. हे ७७ वर्षांचे एक माजी पोलीस अधिकारी आहे. जे त्यांच्या घरी शांततेने बसले होते. त्यांनी एक फेसबुक पोस्ट टाकली. त्यात ते म्हणाले आहेत की अहिंसेच्या मार्गाने आंदोलन व्हायला हवं. तरीदेखील त्यांना उचलून जेलमध्ये घेऊन गेले. त्यांची पत्नी आजारी आहे. रडत आहे. हे सगळं कशासाठी? फक्त तुमचं धोरण लोकांना आवडलं नाही म्हणून सगळं चाललं आहे का?’ असं प्रियंका गांधी म्हणाल्या.


हेही वाचा – नवीन कायदे म्हणजे दुसरी नोटाबंदीच-राहुल गांधी

दरम्यान, शनिवारी सकाळी राहुल गांधी यांनी देखील नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि देशातील इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजपप्रणीत एनडीए सरकारवर तोफ डागली. राहुल गांधी यांनी आज आंदोलन सुरू असलेल्या आसामला भेट दिली. त्यावेळी गुवाहाटीमध्ये त्यांनी तिथल्या लोकांशी संवाद साधला.

First Published on: December 28, 2019 8:07 PM
Exit mobile version