Proning: कोरोनाबाधितांना श्वास घेण्यास अडचण? कमी होतेय ऑक्सिजन पातळी?; आरोग्य मंत्रालयाने सुचविले घरगुती उपचार

Proning: कोरोनाबाधितांना श्वास घेण्यास अडचण? कमी होतेय ऑक्सिजन पातळी?; आरोग्य मंत्रालयाने सुचविले घरगुती उपचार

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर मोठ्या संख्येने कोरोना रूग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असते, परंतु देशभरात ऑक्सिजनच्या तीव्र कमतरतेमुळे बरेच रुग्ण आपला जीव गमावत आहेत. ही गंभीर परिस्थिती पाहता, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या कोरोना रुग्णांसाठी श्वास घेण्याच्या (proning) काही सोप्या पद्धती सुचविल्या आहेत. प्रोनिंग प्रक्रियेने कोरोना रूग्णांच्या ऑक्सिजनची पातळी सुधारण्यास मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते.

Proning म्हणजे नेमकं काय?

आरोग्य मंत्रालयाच्या मते, प्रोनिंग ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे कोरोना रूग्ण स्वतःच स्वतःची ऑक्सिजनची पातळी योग्य राखू शकतो. प्रोन पोझिशन ऑक्सिजनेशन प्रक्रिया वैद्यकीयदृष्ट्या ८० टक्के पर्यंत प्रभावी आहे. ऑक्सिजनची पातळी ९४ च्या खाली गेल्यास, घरच्या घरी प्रोनिंग करावे. प्रोनिंग करण्यासाठी, रुग्णाला पोटावर पालथे पडून डोके आणि मान खाली असेल अशा स्थितीत झोपायचे आहे. होम आयसोलेशनमध्ये असताना बाधिताला प्रोनिंग फायदेशीर आहे. रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते तेव्हा ती नियंत्रणात आणण्यासाठी प्रोनिंग करणं सुरक्षित असते. याचा आयसीयूमध्ये दाखल झालेल्या रूग्णावरही चांगला परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

असे करा प्रोनिंग 

प्रोनिंग प्रक्रिया रुग्णाला पोटावर पालथे झोपू द्या. त्याच्या मानेखाली उशी ठेवा, नंतर छाती आणि पोटाखाली एक-दोन उशी ठेवा आणि दोन उशी पायाच्या खाली ठेवा. ३० मिनिटांपासून २ तास या स्थितीत पडून राहिल्यास रुग्णाला फायदा होऊ शकतो. अशी प्रक्रिया केल्यास फुफ्फुसांमध्ये रक्ताभिसरण चांगले होऊ लागते. फुफ्फुसात असलेला द्रव व्यवस्थित पसरतो, ज्यामुळे ऑक्सिजन फुफ्फुसांमध्ये सहज पोहोचतो. ऑक्सिजनची पातळी देखील खाली घसरत नाही.

कधी करावे प्रोनिंग 

जेव्हा कोरोना रूग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असेल आणि ऑक्सिजनची पातळी ९४ च्या खाली घसरली असेल तेव्हा ही प्रक्रिया केली पाहिजे. तुम्ही होम आयसोलेशनमध्ये असल्यास, वेळोवेळी तुमच्या ऑक्सिजनची पातळी तपासून पहा. या व्यतिरिक्त ताप, रक्तदाब, ब्लड शुगर हे देखील वेळोवेळी तपासून घ्या. योग्य वेळी कोरोना बाधिताने प्रोनिं केल्यास त्याला ते फायदेशीर ठरू शकते. यामुळे बर्‍याच लोकांचे जीवन वाचविण्यास मदत झाली आहे.

First Published on: April 23, 2021 4:01 PM
Exit mobile version