पुलवामा हल्ला मतांसाठी घडवला – रामगोपाल यादव

पुलवामा हल्ला मतांसाठी घडवला – रामगोपाल यादव

समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव (फाईल फोटो)

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरुन राजकीय वातावरण तापले असताना, समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव यांनी या हल्ल्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. ‘पुलवामातील हल्ला हा कट असून, मतांसाठी हा हल्ला घडवून आणण्यात आला आहे’, असे वादग्रस्त विधान यादव यांनी केले आहे. एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना ते म्हणाले की, ‘अर्धसैनिक दल हे सरकारवर नाराज आहे. जवानांना मतांसाठीच मारण्यात आले असून, जम्मू – श्रीनगरदरम्यान कोणतीही तपासणी केली गेली नव्हती. जवानांना सामान्य गाड्यांमध्ये पाठवणे हा एक रचलेला कट होता’. यादव पुढे म्हणाले की, ‘मी आता यावर जास्त काही बोलणार नाही. केंद्रातील सरकार बदलल्यानंतर याची चौकशी केली जाईल’. राम गोपाल यादव यांच्या या खळबळजनक विधानमुळे पक्षासाठी भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पुलवामा हल्ला हा मॅच फिक्सिंग

याआधी काँग्रेसचे नेते बी. के. हरिप्रसाद यांनीही पुलवामा हल्ल्याविषयी अशाचप्रकारे वादग्रस्त विधान केले होते. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या संगनमताने हा हल्ला झाला आहे’, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर टीका केली होती. ‘पाकचे पंतप्रधान इम्रान खान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यादरम्यान मॅच फिक्सिंग झाली होती, हे पुलवामा हल्ल्याकडे पाहिल्यावर लक्षात येते’, असे वक्तव्य हरिप्रसाद यांनी केले होते. यावर पलटवार करत ‘पुलवामा हल्ला राहुल गांधींच्याच सांगण्यावरुन झाला होता’, असं वक्तव्य भाजपने केले होते.

First Published on: March 21, 2019 6:33 PM
Exit mobile version