आमदारांना एकदाच पेन्शन मिळणार; बाकीचे पैसे जनतेच्या भल्यासाठी वापरणार – भगवंत मान

आमदारांना एकदाच पेन्शन मिळणार; बाकीचे पैसे जनतेच्या भल्यासाठी वापरणार – भगवंत मान

पंजाबमध्ये भ्रष्टाचारविरोधात हेल्पलाईन जारी, थेट मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे तक्रार करता येणार

दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने (AAP) सीमोल्लंघन करत पंजाबमध्ये विजय मिळवला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पंजाबच्या जनतेनं आपच्या पदरात घवघवीत यश टाकलं. या विजयानंतर भगवंत मान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि पंजाबमध्ये आपचे सरकार स्थापन केले.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सत्तेत आल्यानंतर एकापाठोपाठ एक अनेक मोठे निर्णय घेत आहेत. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शुक्रवारी आमदारांच्या पेन्शनच्या सूत्रात बदल करण्याची घोषणा केली. त्यानुसार आता आमदारांना एकदाच पेन्शन मिळणार आहे. आतापर्यंत प्रत्येक वेळी आमदार झाल्यावर पेन्शनची रक्कम जोडली जात होती.

”बेरोजगारी हा मोठा प्रश्न आहे. तरुण पदवी घेऊन घरी बसले आहेत. ज्यांनी जाब विचारला, त्यांच्यावर लाठीमार केला. त्यांच्यावर पाणी फेकण्यात आले. त्यांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत, अशा परिस्थितीत ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही मोठी पावले उचलत आहोत”, असं भगवंत मान यांनी म्हटलं.

”आमदार हात जोडून मतं मागतात. पण अनेक आमदार ३ वेळा जिंकले, ४ वेळा जिंकले, ६ वेळा जिंकले, पण तरीही त्यांचा पराभव झाला. त्यांना दरमहा लाखो रुपये पेन्शन मिळते. काहींना ५ लाख तर काहींना ४ लाख पेन्शन मिळत आहे. काही लोक असे असतात, आधी खासदार होते, मग आमदार होते, दोघेही पेन्शन घेत आहेत. अशा परिस्थितीत पंजाब सरकार मोठा निर्णय घेणार आहे”, असंही भगवंत मान यांनी म्हटलं.

”कोणी कितीही वेळा जिंकले तरी आतापासून एकच पेन्शन मिळणार आहे. त्यातून वाचलेले कोट्यवधी रुपये लोकांच्या भल्यासाठी खर्च केले जातील. तसेच आमदारांच्या कौटुंबिक निवृत्ती वेतनातही कपात करण्याचा निर्णय घेतला जात आहे”, असंही भगवंत मान यांनी म्हटलं.

धुरी मतदारसंघावर 55,162 मतांच्या फरकाने विजय

AAP नेते भगवंत सिंह मान यांनी 2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत धुरी मतदारसंघावर 55,162 मतांच्या फरकाने विजय मिळवला. मान यांना एकूण 78850 मते मिळाली. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार दलवीर सिंग गोल्डी यांचा पराभव केला. गोल्डीला 23,688 मते मिळाली. निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षानं मान यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित केले होते.


 हेही वाचा – Video: बीरभूम हिंसेनंतर राज्यसभेत राष्ट्रपती राजवटची मागणी, भाजप महिला खासदारांना अश्रू अनावर

First Published on: March 25, 2022 4:33 PM
Exit mobile version