ब्रिटननंतर रशियातही पुढील आठवड्यात देणार कोरोना लस

ब्रिटननंतर रशियातही पुढील आठवड्यात देणार कोरोना लस

अमेरिकन फायजर कंपनीने त्यांची लस कोरोनावर ९५ टक्के प्रभावी असल्याचा दावा केला असतानाच ब्रिटनकडून कोरोनावरील फायझर लसीला मंजुरी देण्यात आली आहे. तर कोरोना लसीला मंजुरी देणारा ब्रिटन पहिलाच देश ठरला आहे. दरम्यान, ब्रिटनने फायजरच्या लसीला मंजुरी दिल्यानंतर लस स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता आहे. ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यापासून लस देण्यास सुरुवात होणार असून आता रशियातही लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.

दरम्यान, रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी पुढील आठवड्यापासून लसीकरण सुरू करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहे. तर सध्या रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ या लसीच्या २० लाख डोसचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. नुकतीच ब्रिटनने फायजर-बायोटेकने विकसित केलेल्या लसीला मंजुरी देण्याची घोषणा केली यानंतर रशियाने या लसीकरणाची घोषणा केली. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने विकसित केलेल्या स्पुटनिक व्ही या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या अंतरीम निष्कर्षात ही लस ९५ टक्के प्रभावी असल्याचे समोर आले होते. इतर लसीपेक्षा ही लस अधिक प्रभावी असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

येत्या काही दिवसात रशियात २० लाख डोस उपलब्ध करून देण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, शिक्षकांना लस देणार आहे. ही लस मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असली तरी ही लस घेण्याकरता सक्ती करण्यात येणार नाही असेही सांगितले जात आहे.

रशियन लसीची किंमत कमी असल्याने जगभरातील नागरिकांना लस परवडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मॉडर्ना आणि फायजर यांच्या लशीपेक्षा ‘स्पुटनिक व्ही’ची किंमत कमी असणार असल्याचे याआधीच रशियाकडून स्पष्ट करण्यात आले होते. फायजरची किंमत ही प्रति डोस १९.५० डॉलर आणि मॉडर्नाची किंमत २५ ते ३७ डॉलर इतकी असणार आहे. त्यामुळे प्रति व्यक्ती ३९ डॉलर आणि ५० ते ७४ डॉलर इतकी लशीची किंमत असणार आहे. फायजर, मॉडर्ना आणि स्पुटनिक व्ही या लशींच्या दोन डोसची आवश्यकता असणार आहे.


Pfizer Vaccine: कोरोना लसीला मंजुरी देणारा ब्रिटन पहिलाच देश
First Published on: December 3, 2020 12:31 PM
Exit mobile version