क्वॉरंटाईनमध्ये माणसं राहतात की जनावरं? धक्कादायक व्हिडिओ व्हायरल!

क्वॉरंटाईनमध्ये माणसं राहतात की जनावरं? धक्कादायक व्हिडिओ व्हायरल!

देशभरात कोरोनाचा फैलाव मोठ्या संख्येने आता होऊ लागलेला असतानाच उत्तर प्रदेशमधल्या आग्रा शहरातला एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओमध्ये एका गेटच्या पलीकडे क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या लोकांची मोठी गर्दी केली आहे. आणि बंद गेटच्या या बाजूला चहाचे कप आणि बिस्किटं ठेवण्यात आल्याचं दिसत आहे. लांब उभे असलेले पोलीस या क्वॉरंटाईन लोकांना आरडा-ओरडा करून नीट बिस्किटं आणि चहा घ्यायला सांगत आहेत. हा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होऊ लागल्यानंतर आग्र्यातल्या क्वॉरंटाईन लोकांची भीषण परिस्थिती आख्ख्या देशाने पाहिली. आग्र्यमध्ये आत्तापर्यंत ३७२ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक रुग्ण आग्र्यामध्ये आहेत.

आग्र्यामधल्या शारदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स या संस्थेमध्ये हा व्हिडिओ काढण्यात आला आहे. इथे कोरोनाबाधित किंवा कोरोनाच्या संशयित लोकांना क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. मात्र, या व्हिडिओमधलं दृश्य इथलं वास्तव देशासमोर आणणारं आहे. तिथे आणण्यात आलेल्या एका महिलेनेच हा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर टाकला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आग्र्याचे जिल्हाधिकारी प्रभू नारायणसिंह यांनी घटनास्थळाला भेट देऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी केली आणि संबंधितांना योग्य प्रकारची सेवा देण्याचे निर्देश दिले आहेत.

नुकतेच आग्र्याचे महापौर नवीन जैन यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून आग्र्यातल्या परिस्थितीविषयी विनंती केली होती. आग्रा हे भारताचं वुहान बनण्याच्या मार्गावर असल्याची तक्रार त्यांनी या पत्रात केली होती. तसेच, आग्र्याला वाचवण्याची विनंती देखील त्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर आग्र्यामधल्या क्वॉरंटाईन केंद्रांमधली ही दृश्य चिंतेत अधिकच भर टाकणारी ठरली आहेत.

First Published on: April 27, 2020 11:33 AM
Exit mobile version