आर. वेंकटरामानी यांची देशाच्या नव्या अॅटर्नी जनरल पदी नियुक्ती

आर. वेंकटरामानी यांची देशाच्या नव्या अॅटर्नी जनरल पदी नियुक्ती

नवी दिल्ली – ज्येष्ठ वकील आर. वेंकटरामानी यांची देशाचे नवे अॅटर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते या पदावर 3 वर्ष राहणार आहेत. सध्याचे अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबरला संपत आहे. त्याच्या जागी आर. वेंकटरामानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केके वेणुगोपाल यांचा कार्यकाळ 30 जून रोजी संपणार होता. मात्र, केंद्र सरकारने तीन महिन्यांसाठी त्यांचा कार्यकाळ वाढवला होता.

सरकारने सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्याकडे अ‍ॅटर्नी जनरल पदाची जबाबदारी स्वीकारण्याचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र, त्यांनी तो स्वीकारला नाही. दरम्यान, कायदा आणि न्याय मंत्री किरन रिजिजू यांच्या कार्यालयाने ट्विट करून आर. वेंकटरामानी यांच्या नियुक्तीची पुष्टी केली. किरेन रिजिजू यांच्या कार्यालयाच्यावतीने आर. वेंकटरामानी यांना 1 ऑक्टोबर 2022 पासून भारताचे अ‍ॅटर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे म्हटले आहे.

कोण आहेत आर. वेंकटरामन –

13 एप्रिल 1950 रोजी पुडुचेरी येथे जन्मलेले आर. वेंकटरामाणी हे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आणि भारताच्या कायदा आयोगाचे सदस्य आहेत. 3 दशकांहून अधिक काळ ते सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत. आर. वेंकटरामानी यांनी जुलै 1977 मध्ये बार कौन्सिल ऑफ तामिळनाडूमध्ये प्रॅक्टिस सुरू केली, 1979 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली. 1997 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नामांकित केले. 2010 मध्ये त्यांची विधी आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2013 मध्ये त्यांना कायदा आयोगाचे सदस्य म्हणून आणखी एक टर्म मिळाली होती.

First Published on: September 29, 2022 10:28 AM
Exit mobile version