मतदानाचं आव्हान करणारा राहुल द्रविडच नाही करणार मतदान

मतदानाचं आव्हान करणारा राहुल द्रविडच नाही करणार मतदान

राहुल द्रविडचे मत

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड हा कर्नाटक निवडणूक आयोगाचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे. कर्नाटकातील गल्ली-गल्लीत राहुल द्रवीडचे पोस्टर्स लागले आहेत. त्या पोस्टर्समधून राहुल द्रविड लोकांना मतदान करण्याचे आवाहन करत आहे. ‘लोकशाहीच्या विजयासाठी मतदान करा’, असे राहुल द्रविड त्या पोस्टर्समधून बोलत आहे. परंतु, लोकांना मतदानाचे आव्हान करणारा राहुल द्रवीडच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान करु शकणार नाही.

काय आहे कारण?

कर्नाटकमध्ये १८ एप्रिलला लोकसभा मतदान होणार आहे. परंतु, राहुल द्रविड यावर्षी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करु शकणार नाही. राहुल द्रविड आणि त्याच्या पत्नी इंदिरानगर येथून आरएमवी एक्सटेंशन येथे शिफ्ट झाले आहेत. घर बदलल्यानंतर त्यांनी इंदिरानगर येथील मतदारांच्या यादीतून आपले नाव वगळण्यात यावा, असा अर्ज दाखल केला होता. त्यामुळे इंदिरानगरच्या मतदारांच्या यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आले. आरएमवी एक्सटेंशन येथे राहायला आल्यावर त्यांनी त्या पत्त्यावरुन मतदानाचा अर्ज भरला नाही. त्यामुळे त्यांचे नाव मतदारांच्या यादीमध्ये आलेले नाही.

यादीत नाव सामिल करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रयत्न

यासंदर्भात डोम्लूर सब डिव्हिजनचे अधिकारी बासावराजू मागी यांनी सांगितले की, ‘द्रविड यांचे भाऊ विजय यांनी राहुल आणि त्यांच्या पत्नीचे नाव मतदार यादीतून काढण्याचा अर्ज दाखल केला होता. मतदार यादीतून त्यांचे नाव बदलल्यानंतर राहुल यांनी यादीत नाव सामावून घेण्यासाठी फॉर्म ६ भरला नाही.’ तर माथीकेर सब डिव्हिजनचे अधिकारी रुपा यांनी सांगितले की, ‘मतदार यादीत नाव सामिल करण्याच्या मोहिमेअंतर्गत आमचे काही अधिकारी राहुल द्रविड यांच्या घरी गेले. मात्र, त्यांना घरात एंट्री दिली गेली नाही. त्यावेळी त्यांना सांगण्यात आले होते की, राहुल द्रविड सध्या विदेशात आहेत. त्यांनी मतदार यादीत नाव सामिल करण्याचे कोणतेही संदेश पाठवलेले नाही.’ यानंतर विदेशातून आल्यानंतर राहुल द्रविड यांनी निवडणूक अधिकारी बासावराजू यांना आपले नाव इंदिरानगर मतदार यादीत सामील करता येईल का? असे विचारले होते.

First Published on: April 14, 2019 7:58 PM
Exit mobile version