Rafale deal : राहुल गांधींचं मोदींना १५ मिनिटं चर्चेचं आव्हान

Rafale deal : राहुल गांधींचं मोदींना १५ मिनिटं चर्चेचं आव्हान

राहुल गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेल करारावर माझ्याशी १५ मिनिटं चर्चा करावी असं थेट आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलं आहे. चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देऊ शकत नाहीत असा टोला देखील राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना लगावला आहे. छत्तीसगडमध्ये अंबिकापूर येथे प्रचारादरम्यान राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. पंतप्रधानांनी कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी यावं आणि राफेल करारावर माझ्याशी १५ मिनिटं चर्चा करावी. त्यावेळी आपण अनिल अंबानी, हिंदुस्तान एरॉनॉटिक्स आणि विमानाच्या किमतीवर चर्चा करू. राफेल करारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणतेही नियम पाळले नाहीत. त्यांनी सीबीआयमध्ये हस्तक्षेप करत रात्री दोन वाजता संचालकांची उचलबांगडी केली. याप्रश्नाला देखील पंतप्रधानांकडे कोणतेही उत्तर नसेल अशा शब्दात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट लक्ष्य केलं.

वाचा – राफेल करार बोफर्सचा बाप – शिवसेना

यावेळी त्यांनी छत्तीसगडमधील भाजप सरकारवर देखील जोरदार हल्ला चढवला. नोटीबंदीच्या काळात उद्योगपतींना फायदा झाला. मागील १५ वर्षापासून छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार आहे. पण सरकार सर्व अाघाड्यांवर अपयशी ठरल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. पंतप्रधान मोदी आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री यांनी कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे छत्तीसगडमध्ये काँग्रेसला सत्ता द्या. सत्तेत आल्यानंतर काँग्रेस सर्व सरकारी जागा भरेल. तरूणांना रोजगार देईल. तसेच सत्तेत आल्यानंतर १० दिवसामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असे आश्वासन देखील काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगडच्या जनतेला दिले. दोन टप्प्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीचे निकाल ११ डिसेंबर रोजी लागणार आहेत.

First Published on: November 18, 2018 12:32 PM
Exit mobile version