कोरोना मृतांचा खरा आकडा जाहीर करुन कुटुंबियांना ४ लाखांची भरपाई द्या; राहुल गांधींची केंद्राकडे मागणी

कोरोना मृतांचा खरा आकडा जाहीर करुन कुटुंबियांना ४ लाखांची भरपाई द्या; राहुल गांधींची केंद्राकडे मागणी

कोरोना महामारीमुळे जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांच्या भरपाईचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी केंद्र सरकारकडे दोन मागण्या केल्या आहेत. कोरोना मृतांची योग्य आकडेवारी जाहीर करुन कोरोनामुळे ज्या कुटुंबीयांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे त्यांना ४ लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

राहुल गांधींनी ट्विट करत ही मागणी केली आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसने यासंदर्भात एक मोहीम सुरु केली आहे. ट्विटमध्ये एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये गुजरातमध्ये राहणाऱ्या लोकांच्या वेदना सांगितल्या आहेत, ज्यांनी आपल्या जवळच्यांना कोरोनाने गमावले आहे. राहुल गांधींनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, गुजरात मॉडेलच्या चर्चा होतच असतात. आम्ही ज्या कुटुंबांशी बोललो त्या सर्वांनी सांगितले की, कोरोनाच्या वेळी त्यांना ना ऑक्सिजन मिळाला, ना बेड मिळाले, ना व्हेंटिलेटर मिळाले.

गुजरातमध्ये १० हजार नाही तर तीन लाख लोकांचा मृत्यू

राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा सरकारला लोकांना मदत करायची होती तेव्हा सरकार नव्हते. लोकांना नुकसानभरपाईची गरज असतानाही सरकार नाही आहे. राहुल गांधी म्हणाले की, राज्य सरकार खोटी आकडेवारी देते, राज्यात १० हजार नाही तर तीन लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पंतप्रधानांकडे विमान खरेदीसाठी पैसे आहेत पण…

पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधानांकडे स्वत:साठी विमान खरेदी करण्यासाठी ८ हजार ५०० कोटी रुपये आहेत. मात्र कोविडमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांसाठी पैसे नाहीत. राहुल गांधींनी आरोप केला की, कोविडच्या वेळी काही उद्योगपतींना पैसे दिले, त्यांचे कर माफ केले. संपूर्ण भारत दोन-तीन उद्योगपतींना दिला जात आहे. मात्र गरीब लोकांना कोविडची भरपाई दिली जात नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

केंद्राची ५० हजार रुपयांची भरपाई देण्याची घोषणा

सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितले होते की, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची एक्स-ग्रेशिया देण्याची शिफारस केली आहे.

 

First Published on: November 24, 2021 5:04 PM
Exit mobile version