बेजबाबदार वक्तव्य केल्यास कठोर कारवाई

बेजबाबदार वक्तव्य केल्यास कठोर कारवाई

काँग्रेस नेते राहुल गांधी

मी मोठी लढाई लढतो आहे. सर्वांना पक्षाच्या व्यासपीठावर बोलण्याचा हक्क आहे, मात्र पक्षाचा कुणीही नेता बेजबाबदार वक्तव्य करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल’, असा इशारा बेजबाबदार वक्तव्य करणार्‍या काँग्रेस नेत्यांना राहुल गांधी यांनी दिला आहे.राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी यांनी हा इशारा दिल्याचे सांगितले जाते. मध्यंतरी हिंदू तालीबान, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी केले होते. त्या वक्तव्याबाबत राहुल गांधी नाराज असल्याचे सांगितले जाते.

मोदी हताश झाले -सोनिया

यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या की, मोदींच्या भाषणात ते हताश दिसत होते. यावरून स्पष्ट आहे की, मोदी सरकारची उलटी गणती सुरू झाली आहे. सध्या गरीबांमध्ये मोदी सरकारमुळे भीती आणि निराशा पसरली आहे. आपले मतभेद विसरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित (आरएसएस) भाजपला सत्तेतून उतरवण्यासाठी विरोधी पक्षांनी आगामी निवडणुकांमध्ये सोबत यावे.

भाजप जुमला पार्टी -मनमोहन सिंग

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही मोदींवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की मोदी स्वतःची स्तुती करत असून भाजप ’जुमला पार्टी’ आहे. त्यांच्याजवळ भारताच्या विकासाचा कोणताही आराखडा नाही. मोदी सरकारने २०२२ पर्यंत कृषी उत्पादन दुप्पट करण्याचे लक्ष्य ठरवले आहे. मात्र त्यासाठी शेती विकासाचा दर १४ टक्क्यांनी वाढवावा लागेल. जे सध्या तरी शक्य असल्याचे दिसत नाही. काँग्रेस नेते पी. चिदंबरम म्हणाले की, आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी राज्यातील प्रादेशिक पक्षांशी आघाडी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काँग्रेस १२ जागांसह मजबूत स्थितीमध्ये आहे. त्यामध्ये तिप्पट वाढ करता येऊ शकते. काँग्रेस कार्यकारिणी समितीची ही पहिलीच बैठक आहे. पक्षाबाबत मोठे निर्णय घेणारी काँग्रेसची ही महत्त्वाची संस्था आहे. या बैठकीत सोनिया गांधी, काँग्रेसचे सरचिटणीस अशोक गेहलोत तसेच विविध राज्यांचे प्रमुख नेतेही उपस्थित होते.

First Published on: July 23, 2018 6:43 PM
Exit mobile version