यंदा सरासरीच्या ९६ टक्के पाऊस; हवामान खात्यानं वर्तवला अंदाज

यंदा सरासरीच्या ९६ टक्के पाऊस; हवामान खात्यानं वर्तवला अंदाज

शहरात पावसाची उघडीप.

उन्हाच्या झळा लागणारे सर्वच जीव चातकासारखे पावसाची वाट पाहतं आहेत. अजून मान्सून ऋतूला वेळ असला तरीही पाऊस कधी पडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. अशातच आज, सोमवारी हवामान खात्याने पत्रकार परिषद घेत यंदाच्या मोसमातील पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यंदाच्या पावसाळ्यात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याचे सचिव एम. राजिवन नायर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

सरासरीएवढाच पाऊस पडेल

दरम्यान, सध्या निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने निवडणूक आयोगाने दिलेल्या परवानगीनंतर आज, १५ एप्रिल रोजी दुपारी मान्सूनचा अंदाज जाहीर करण्यात आला. यंदाच्या पावसाळ्यात सरासरीएवढाच पाऊस पडेल. यंदा मान्सूनवर एल निनोचा प्रभाव असला तरी नंतर तो कमी होईल. तसेच अखेरीस मान्सून आपली सरासरी गाठेल. तसेच एकूण सरासरीच्या ९६ टक्के पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदा एल निनोचा प्रभाव असल्याने त्याचा भारतीय मान्सूनवर विपरित परिणाम होणार असल्याचा अंदाज अमेरिकन हवामान संस्था, ऑस्ट्रेलियन संस्था तसेच स्कायमेट यांनी व्यक्त केला आहे. स्कायमेटने यंदा सरासरीच्या ९३ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे आता भारतीय हवामान खाते मान्सूनबाबत नेमका काय अंदाज वर्तवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

First Published on: April 15, 2019 4:49 PM
Exit mobile version