मोदींनी ‘अनिल अंबानी की जय’ म्हणावं – राहुल गांधी

मोदींनी ‘अनिल अंबानी की जय’ म्हणावं – राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांंनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी यांनी ‘भारत माता की जय’ असं म्हणण्याऐवजी ‘मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या आणि निरव मोदी की जय’ असं म्हणायला हवं, असा टोला त्यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे. मोदींंना मनापासून जर भारतमातेचा आदर असता, त्यांना खरोखरच भारतमातेचा जयजयकार करायचा असका तर ते शेतकऱ्यांना कधीच विसरले नसते, असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले. मंगळवारी (आज) राजस्थानमधील अलवार येथील प्रचारसभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बोलत होते. प्रचारसभेदरम्यान त्यांनी भाजप सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. राफेल कराराच्या मुद्द्यावरुनही राहुल गांधी यांनी यावेळी मोदींना टोमणा मारला. नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणात कधीच राफेल कराराचा उल्लेख करत नाहीत आणि जर त्यांनी तसं केलं तर लोकंच ‘चौकीदार चोर है’ अशा घोषणा देतील, असा दावा त्यांनी यावेळी केला.


योजनेचं नावं बदलून ‘अंबानी’ योजना करावं…

मोदींनी खरंच कल्याणकारी योजना राबवली का? सर्व पैसा हा भ्रष्टांकडे जात आहे, ज्यांनी देशाला लुबाडलं ते देश सोडून पळून गेले आहेत. सरकारने कल्याणकारी योजनांचे नाव बदलून अंबानी योजना, नीरव मोदी योजना ठेवावं, असा टोला राहुल यांनी यावेळी लगावला. देशातील उद्योगपतींनी मोदींना सत्तेत आणले. जनतेच्या पैशांमधून त्यांना उद्योगपतींनी पंतप्रधानपदी बसवले, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. काँग्रेसच्या काळात गॅस सिलिंडर ३६० रुपयांमध्ये उपलब्ध होते. आता भाजपाच्या काळात गॅस सिलिंडरचे दर काय आहेत? काँग्रेसच्या काळात इंधन, गॅसचे दर काय होते यावर मोदीजी कधी भाष्य करत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. मोदींच्या वचनानुसार जर देशातील दोन कोटी तरुणांना रोजगार मिळाला असता तर अलवारच्या चार तरुणांनी आत्महत्या का केली असती? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. राजस्थानमध्ये आता वसुंधरा राजे सरकारला भविष्य उरलेले नाही, असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

First Published on: December 4, 2018 2:59 PM
Exit mobile version