पत्नीची हत्या करुन ६ महिने व्हॉट्सअॅपवर ठेवले ‘जिवंत’

पत्नीची हत्या करुन ६ महिने व्हॉट्सअॅपवर ठेवले ‘जिवंत’

राखी श्रीवास्तव यांचा जूनमध्ये खून करुन डिसेंबरपर्यंत व्हॉट्सअॅपवर जिवंत ठेवले.

नेपाळमध्ये राखी उर्फ राजेश्वरी श्रीवास्तव यांच्या हत्येचा छडा उत्तर प्रदेश पोलिसांनी यशस्वीरित्या लावला आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी राजेश्वरीचे पती डॉ. धर्मेंद्र प्रताप सिंह यांना गोरखपूरहून अटक केली आहे. जून २०१८ मध्ये धर्मेंद्रने आपल्या पत्नीची नेपाळमध्ये हत्या केल्यानंतर सहा महिने पत्नीचे सोशल मीडिया अकाऊंट अक्टिव्ह ठेवले. राखीच्या घरच्यांना आणि पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याने ही शक्कल लढवली असल्याचे तपासातून समोर आले आहे.

प्रकरण काय आहे

उत्तर प्रदेश एसटीएफ पोलीस अधिक्षक अमिताभ यश यांनी या प्रकरणाचा उलगडा केला आहे. त्यांनी सांगतिले की, शाहपुराच्या बिछिया भागात राहणारी राजेश्वरी उर्फ राखी श्रीवास्तव जूनमध्ये हरवली होती. राखीचा भाऊ अमर प्रकाश याने ४ जुलैला शाहपुर पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार नोंदवली. तसेच आपल्या बहिणीला तिचा दुसरा पती मनीष सिन्हा यानेच लपवले असल्याचा आरोप लावला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घ्यायला सुरुवात केली.

मनीषची चौकशी केली असता पोलिसांना कळले की, ते दोघेही जून महिन्यात नेपाळला गेले होते. मात्र तीन जून रोजी तो पुन्हा काही दिवसांसाठी भारतात आला. मात्र पाच जून पासून त्या दोघांचा संपर्कच झाला नाही. राखीच्या फोनची रिंग वाजत होती, व्हॉट्सअॅप अॅक्टिव्ह होते, मात्र मेसेजेस किंवा कॉलचे उत्तर मिळत नव्हते. शेवटी मनीषने राखीच्या भावाला ही माहिती दिली. राखी याआधीही अनेक दिवस घरातून बाहेर पडून एकांतात राहायची. त्यामुळे तिचे कुटुंबियांना हे नेहमीचे झाले होते. मात्र या काळात ती फोनवर संपर्कात असायची.

मात्र एसटीएफ पोलिसांच्या असे निदर्शनास आले की, राखीच्या फोनचे लोकेशन हे नेपाळहून भारताच्या विविध ठिकाणी फिरताना दिसले. चार ऑक्टोबर रोजी एका कौटुंबिक ग्रुपमधून राखी लेफ्ट झाली. त्यानंतर राखीच्या भावाने याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. उप्र पोलिसांनी राखीचा फोटो नेपाळ पोलिसांना पाठवला असता आठ जूनला त्यांना एक मृतदेह मिळाला असल्याचे कळले. हा मृतदेह राखीचाच असल्याचे नंतर कळले.

असे अडकले डॉ. धर्मेंद्र सिंह

एसटीएफने आपल्या तपासाच्या कक्षा वाढवल्या असताना डॉ. धर्मेंद्र यांचे नाव समोर आले. गोरखपूरच्या आर्यन हॉस्पिटलचे मालक आणि प्रसिद्ध सर्जन डॉ. डी.पी.सिंह आणि राखी यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यांनीच नेपाळच्या पोखरा डोंगरावरून राखीला ढकलून तिची हत्या केली होती. डॉ. डीपी सिंह यांचे लग्न झालेले असतानाही २०११ साली त्यांनी राखीशी एका मंदिरात विवाह केला होता. तीन वर्ष एकत्र राहिल्यानंतर २०१४ साली त्यांनी तिला सोडून दिले. २०१६ साली राखीने मनीषशी दुसरे लग्न केले. मात्र तरिही ती डॉ. डीपी सिंहला ब्लॅकमेल करत होती.

पाच वेळा रचला होता खूनाचा कट

डॉ. डीपी सिंहने पाच वेळा राखीचा खून करण्याचा कट रचला होता. मात्र प्रत्यक्ष खून करण्याची हिमंत त्यांना झाली नाही. त्यानंतर आपले दोन कर्मचारी प्रमोद आणि देशदिपक यांना जादा पगाराचे आमिष दाखवून खूनाचा सहावा कट रचला. जून २०१८ मध्ये राखी मनिषसोबत नेपाळमध्ये फिरायला गेली होती. त्यावेळी डॉक्टरने तिला संपर्क साधून भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार राखीने मनीषला भारतात परत पाठवले आणि स्वतः तिथेच थांबली. ६ जूनला डॉ. डीपी सिंहने तिला दारूतून नशेचे औषध दिले. त्यानंतर तिला दरीत ढकलून दिले.

First Published on: December 24, 2018 1:53 PM
Exit mobile version