ॲलोपॅथीच्या १ हजार डॉक्टरांना आयुर्वेदामध्ये सहभागी करणार, रामदेव बाबांचा इशारा

ॲलोपॅथीच्या १ हजार डॉक्टरांना आयुर्वेदामध्ये सहभागी करणार, रामदेव बाबांचा इशारा

देशात कोरोनाचा हाहाकार सुरु असताना ॲलोपेथीक आणि आयुर्वेदा यावर विधान करुन योगगुरु रामदेव बाबा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आयएमए कडून रामदेवबाबांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे तसेच नोटीसही धाडण्यात आली आहे. परंतु आता रामदेव बाबांनी ॲलोपॅथीच्या १००० डॉक्टरांना आयुर्वेदामध्ये सहभागी करणार असल्याचा नवा इशारा दिला आहे. कोरोनाच्या आजारावरुन ॲलोपॅथीच्या उपचारपद्धतीवर रामदेव बाबांनी विधान केले होते तर आता हरिद्वारमधील योगा ग्राम केंद्रामध्ये येत्या काळात १ हजार ॲलोपॅथीच्या डॉक्टरांना आयुर्वेदामध्ये सहभागी करण्याचा मानस असल्याचे रामदेव बाबांनी म्हटले आहे.

हरिद्वारमधील योग केंद्रात बाबा रामदेव संबोधित करत होते. यावेळी देशभरातील लोकं उपस्थित होते यामध्ये एमबीबीएस आणि एमडी डिग्री असलेले अनेक डॉक्टर या शिबिरात उपस्थित झाले होते. यामधील काही डॉक्टरांना ॲलोपॅथीचे दुष्परिणाम सहन करावे लागल्यामुळे आयुर्वेदामध्ये सहभागी झाले आहेत. तर काहीजण आपणहून या आयुर्वेदा उपचारपद्धतीत वळले आहेत. यातील अनेक डॉक्टरांनी प्रॅक्टीसमधून ऐच्छिक सेवानिवृत्तीदेखील घेतली आहे.

रामदेव बाबांनी म्हटले आहे की, येत्या १ वर्षाच्या कालावधीत १००० डॉक्टरांना आयुर्वेदामध्ये सहभागी करण्याचे ठरवलं आहे. आयएमएचे अध्यक्ष डॉ. जे. एल. जयलाल यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, डॉक्टरांचे धार्मिक परिवर्तन नाही तर त्यांच्या विचारांचे परिवर्तन करणार आहोत. एखाद्याच्या श्रद्धा आणि धर्माचे समर्थन करणे आणि त्यांचे संरक्षण करणे वाईट नाही. ख्रिश्चन धर्माचे समर्थन जागतिक सामर्थ्याने केले आहे. इस्लामला मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. औषध उद्योगांना मोठा पाठिंबा आहे. परंतु योग आणि आयुर्वेदाला कोणाचे समर्थन मिळेल तुम्हीच त्यांना आधार दिला. कोणीही पुरातन आयुर्वेदाला गांभीर्याने घेत नव्हते. लोक जर उपचाराचा प्रसार करण्यासाठी आपल्या मिळकतीतील २ टक्के देऊ शकले तर यामधून खूप काही मिळू शकते असे विधान रामदेव बाबांनी केले आहे.

First Published on: May 30, 2021 5:29 PM
Exit mobile version