‘निमंत्रण आलं नाही, तरी उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार का?’

‘निमंत्रण आलं नाही, तरी उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार का?’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राम मंदिराच्या भूमिपूजनाची सगळ्यांनाच उत्सुकता असताना त्याचा मुहूर्त अखेर ठरवण्यात आला असून ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजनाचा कार्यक्रम अयोध्येला होणार आहे. या कार्यक्रमासाठी १५० निमंत्रितांची यादी तयार करण्यात आली असून त्यामध्ये शिवसेनाप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा समावेश असेल का? यावर देखील अजून निश्चित अशी माहिती नसताना आता भाजप नेते आणि अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अयोध्येला भूमिपूजनासाठी जाणारच, असं संजय राऊत म्हणत आहेत. यावर बोलताना दानवे म्हणाले, ‘निमंत्रण आलं नाही, तरी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे एक सामान्य रामभक्त म्हणून अयोध्या दौऱ्यावर जाणार का?’, असा सवाल रावसाहेब दानवे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंच्या अयोध्येला जाण्यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह असल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार माजिद मेमन (Majid Memon) यांनी ‘धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी अयोध्येला जाणं टाळावं’, अशी भूमिका मांडली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून त्यांच्या अयोध्येला जाण्याचं समर्थन केलं जात आहे. त्यावर बोट ठेवत रावसाहेब दानवे यांनी टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरे निमंत्रणाशिवाय अयोध्येला जाणार का? गरज पडल्यास त्यांनी सरकारमधल्या सहकाऱ्यांची परवानगी घेऊन अयोध्येला जावं. आधी पहले मंदिर फिर सरकार म्हणणारे उद्धव ठाकरे आता पहले सरकार, फिर मंदिर म्हणत आहेत’, असा टोला देखील दानवेंनी यावेळी लगावला.

First Published on: July 21, 2020 6:40 PM
Exit mobile version