कतरिना कैफच्या गालासारखे रस्ते बनवा; काँग्रेस मंत्र्याच्या वक्तव्याने नवा वाद

राजस्थानमध्ये नवीन मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर नुकतेच गेहलोत सरकारमध्ये पंचायती राज राज्यमंत्री झालेले राजेंद्र गुढा आता आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. वास्तविक, मंत्री झाल्यानंतर गुढा पहिल्यांदाच झुनझुनु या त्यांच्या विधानसभा मतदारसंघात आले होते. यावेळी राज्यमंत्री राजेंद्र गुढा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. रस्ता तयार करण्याची मागणी लोकांनी केली होती. दरम्यान, माझ्या भागात कतरिना कैफच्या गालासारखे रस्ते बांधले जावेत, असे गुढा यांनी गमतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना सांगितले. या वक्तव्यावरुन आता वाद सुरु झाला आहे.

गुढा यांच्या मतदारसंघात प्रशासन गावांच्यासोबत’ या योजनेसंबंधित कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमावेळी राजेंद्र गुढा यांनी आपल्या गावरान भाषेत अभियांत्रिकांना रस्त्यासंबंधित सूचना दिल्या. यावेळी त्यांनी हेमा मालिनी म्हातारी झाली आहे, रस्ते हे बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या गालांसारखे बनले पाहिजेत, असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर कार्यक्रमात उपस्थित गावकऱ्यांमध्ये हशा पिकला.

लोकांनी खराब रस्त्यांच्या बांधकामाबाबत मंत्र्यांकडे तक्रार केली होती. यानंतर राजेंद्र गुढा यांनी पीडब्ल्यूडीचे मुख्य अभियंता एनके जोशी यांना फोन करून सांगितले की, माझ्या गावात कतरिना कैफच्या गालासारखे रस्ते बनवा. कारण हेमा मालिनी आता म्हाताऱ्या झाल्या आहेत, असं वक्तव्य गुढा यांनी केलं.

First Published on: November 24, 2021 6:23 PM
Exit mobile version