निवडणुकांनंतर RSS राम मंदिर बांधणारच – मोहन भागवत

निवडणुकांनंतर RSS राम मंदिर बांधणारच – मोहन भागवत

अयोध्येतील राम मंदिर उभारणीचा प्रश्न राजकीय वर्तुळात अक्षरश: चघळला जात आहे. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी राम मंदिर बांधणीचा मुद्दा उचलून धरला आहे. शिवसेना, भाजपसह अन्य पक्षाच्या नेत्यांनी गेल्या काही काळात अयोध्येचा दौरा केला असून, राममंदिर लवकरच उभारू अशी घोषणाही केली
आहे. मात्र, राम मंदिर नक्की कोण बांधणार? हा प्रश्न अजूनही वादातीत आहे. दरम्यान, सरसंघचालक मोहन भागवत यांनी याप्रकरणी एक नवीन वक्तव्य केले आहे. ‘केंद्रात कुणाचेही सरकार असो लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) राम मंदिर उभारणीस सुरूवात करेल’, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. एक दिवसापूर्वीच विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांनी राम मंदिरप्रकरणी हे मोठे वक्तव्य केले आहे.


वाचा : राम मंदिराचे बांधकाम २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार!

उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये संघाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान बोलताना भागवत यांनी राम मंदिर, धार्मिक भेदभाव आणि जातीय आरक्षणासारख्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. या मुद्द्यांना धरुन विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी यावेळी दिली. कुंभ मेळ्यात झालेल्या धर्म संसदेनुसारच राम मंदिराची उभारणी केली जाईल, असे भागवत यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, राम मंदिराच्या निर्मितीची नेमकी तारीख भागवत यांनी यावेळी सांगितली नाही. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून काही प्रतिक्रिया उमटणार का? हे येणारी वेळच सांगेल.

First Published on: February 7, 2019 9:02 AM
Exit mobile version