एअरलिफ्टची रणनीती तयार

एअरलिफ्टची रणनीती तयार

रशियाने युक्रेनवर हवेतून, जमिनीवरून आणि समुद्राच्या मार्गानेही हल्ला चढवला आहे. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या 16 हजारहून अधिक भारतीयांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने रणनीती आखली असून युक्रेनमध्ये विशेष विमाने पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युक्रेनमधील सर्व हवाई क्षेत्र बंद करण्यात आल्याने येथून भारतीयांना बाहेर काढणे कठीण झाले आहे. परंतु केंद्र सरकारने काही सुरक्षित मार्ग शोधून काढले आहेत. येथूनच त्यांना बाहेर काढण्यात येणार आहे. अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याचा खर्चही केंद्र सरकार उचलणार आहे.

युक्रेनमधील भारतीय नागरीक आणि विद्यार्थ्यांसाठी भारतीय दूतावासाने एक अ‍ॅडव्हायजरी शुक्रवारी जारी केली आहे. त्यात भारत सरकार रोमानिया आणि हंगेरीमधून नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल, असे म्हटले आहे. रस्ते मार्गाने, कीवहून निघाल्यास पोलंडला पोहोचायला 9 तास आणि रोमानियाला सुमारे १२ तासांत पोहोचता येते. त्याचा रोड मॅप तयार करण्यात आलेला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॉवरोव आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांच्याशी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबंधी चर्चा केली आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी ‘एअर इंडिया’ची दोन विशेष विमाने पाठवण्यात येणार आहेत. ‘एअर इंडिया’ची ही दोन विमाने शुक्रवारी रोमानियाची राजधानी ‘बुकरेस्ट’साठी रवाना झाली. रोमानिया – युक्रेन सीमेवर पोहोचू शकणार्‍या भारतीय नागरिकांना घेऊन ही विमाने माघारी परतणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी सीमेवरून भारतीय नागरिकांना बुकरेस्ट विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करणार आहेत.

शरणागतीशिवाय चर्चा नाही – रशिया
रशियन सैन्य दारात पोहोचल्यानंतर युक्रेनकडून रशियाशी चर्चेची तयारी दर्शवण्यात आली. कीवच्या तटस्थतेवर आम्ही रशियाशी चर्चा करण्यास तयार आहोत, परंतु, सुरक्षेची हमी मिळावी, असे म्हणत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचे सल्लागार मायखाइलो पोडोलियाक यांनी युक्रेनची भूमिका मांडली. आम्ही युक्रेनशी चर्चा करण्यासाठी तयार आहोत. मात्र, आधी युक्रेनच्या लष्कराला युद्ध थांबवावे लागेल, असे म्हणत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लेवरोव्ह यांनीदेखील नरमाईची भूमिका स्वीकारली.

96 तासांत युक्रेनवर ताबा
युक्रेनच्या राजधानीत रशियाचे 10 हजारांहून अधिक सैनिक दाखल झाले असून रशिया येत्या 96 तासांत युक्रेनवर ताबा मिळवेल, असा दावा रशियाने केला आहे.

रशियाचे 1 हजार सैनिक ठार
युक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांनी रशियाचे 1 हजार जवान मारल्याचा दावा केलाय. दुसरीकडे हल्ले थांबवा अन्यथा नाटोकडेही अणूबॉम्ब आहेत, असा इशारा फ्रान्सने रशियाला दिला आहे.

यूएनमध्ये रशियाविरोधात प्रस्ताव
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत रशियाच्या लष्करी कारवाईविरोधात प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला भारत समर्थन देणार की रशियाची साथ देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

First Published on: February 26, 2022 4:00 AM
Exit mobile version