Russia-Ukraine Conflict:रशियाला यु्द्धाची खुमखुमी, युक्रेनच्या सीमेवर वाढवल्या सैनिकांच्या फौजा

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती अजूनही कायम असून कोणत्याही क्षणी दोन्ही देश एकमेकांवर आक्रमण करू शकतात. असे नुकतेच सॅटेलाईटने काढलेल्या फोटोतून समोर आले आहे. यामुळे एकीकडे आम्हांला शांतता हवी आहे असे सांगत युक्रेनच्या सीमेवरील सैनिक हटवल्याचा दावा करणाऱ्या रशियाचा खोटारडेपणा जगासमोर आला आहे. तर दुसरीकडे रशियावर विश्वास नसल्याचे अमेरिकेकडून वारंवार सांगितले जात असून युक्रेनच्या सीमेवर रशियाने ७ हजार सैनिकांची ज्यादा कुमक तैनात केल्याचे सॅटेलाईट फोटोतून स्पष्ट झाले आहे.

रशिया- युक्रेन यांच्यातील यु्द्ध टाळण्यासाठी भारतासह अमेरिका आणि इतर देश प्रयत्न करत आहेत. त्यातही युक्रेनच्या तुलनेत रशिया यु्द्धासाठी अधिक आक्रमक असून १६ फेब्रुवारीला रशियन सैनिक युक्रेनवर हल्ला करण्याची भीती अमेरिकेने व्यक्त केली होती. पण वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावामुळे रशियाने युक्रेन सीमेवरून सैनिकांना माघारी बोलावण्यात आल्याचा दावा केला. यामुळे संपू्र्ण जगाचे लक्ष लागून राहीलेल्या या दोन्ही देशांमधील युद्ध टळल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

पण युक्रेनच्या सीमेवरून अद्यापही रशियन सैनिक मागे हटले नसून उलट सीमेवर मोठ्या प्रमाणात रशियन सैनिकांची कुमक धडकत असल्याचे पाहात आहोत असे अमेरिकेचे संरक्षण सचिव अँटनी ब्लिकेंन (Antony Blinken) यांनी सांगितले. तर रशियाने मात्र आपले सैनिक आणि रणगाडे यु्क्रेन सीमेवरून परतत असल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. पण त्यात काही तथ्य नसल्याचे अमेरिकेच्या Maxar Technologies च्या माध्यमातून काढण्यात आलेल्या सॅटेलाईट फोटोमध्ये स्पष्ट झाले. त्यात रशियाने बेलारुस-युक्रेनच्या सीमेपासून अवघ्या ६ किमी अंतरावरील प्रिपयात नदीवर एक पुलही उभारला आहे. ज्यामुळे रशिया आणि युक्रेनमधील अंतर कमी झाले आहे.

१५ फेब्रुवारीच्या सॅटेलाईट फोटोमध्ये रशियन लढाऊ हेलीकॉप्टर बेलारुसच्या ज्याब्रोव्का येथे तैनात असल्याचे दिसत आहे. अशी जवळपास १८ लढाऊ हेलीकॉप्टर रशियाने तैनात ठेवली आहेत. यात Mi-8 आणि Ka-52 हेलिकॉप्टरचाही समावेश आहे. यांच्याजवळ सैनिकांचा राबता जरी फोटोत दिसत नसला तरी ते जवळपास खंदकात लपून बसल्याची शक्यता नाकारता येत नाही असेही अमेरिकेने म्हटले आहे. हे फोटो पाहता युक्रेन सीमेवरून सैनिकांना माघारी बोलावल्याचा रशियाचा दावा मात्र खोटा असल्याचे समोर आले आहे.

 

First Published on: February 17, 2022 6:47 PM
Exit mobile version