पंतप्रधानांच्या विरोधात लढणाऱ्याची उमेदवारी रद्द; तेजबहादूर गेले सुप्रीम कोर्टात

पंतप्रधानांच्या विरोधात लढणाऱ्याची उमेदवारी रद्द; तेजबहादूर गेले सुप्रीम कोर्टात

तेजबहादूर आणि पंतप्रधान (सौजन्य-डीपी पोस्ट)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेल्या निवृत्त जवान तेजबहादूर यादव यांची उमेदवारी काही दिवसांपूर्वीच रद्द करण्यात आली. त्यानंतर आता या प्रकरणी यादव यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. प्रख्यात वकील प्रशांत भूषण यादव त्यांच्या बाजूने युक्तिवाद करणार आहेत. यादव यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जात माहिती लपवल्याचा आक्षेप घेत निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला. यादव यांनी समाजवादी पार्टीकडून उमेदवारी अर्ज भरला होता.

तेजबहादूरवर निलंबनाची कारवाई 

तेजबहादूर यादव यांनी सीमा सुरक्षा दलात असताना जवानांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले होते. सीमा सुरक्षा दलाने तेजबहादूर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. बीएसएफने केलेल्या कारवाईची माहिती न दिल्यानंच यादव यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला. भ्रष्टाचार किंवा निष्ठेवर शंका उपस्थित करुन बीएसएफमधून निलंबन न झाल्याची कागदपत्रं जमा न केल्यानं निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला. बीएसएफमधील निलंबनाचं कारण लपवल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी यादव यांचा अर्ज स्वीकारला नाही. या निर्णयाबद्दल यादव यांनी नाराजी व्यक्त केली. निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय भेदभाव करणारा असल्याचा आरोप त्यांनी केला. तेजबहादूर यादव यांनी आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसीतून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर समाजवादी पार्टीनं त्यांना तिकीट दिलं. यासाठी समाजवादी पार्टीनं शालिनी यादव यांची उमेदवारी मागे घेतली.

First Published on: May 6, 2019 1:43 PM
Exit mobile version