Corona Vaccination: २ ते १८ वयोगटातील मुलांच्या चाचण्यांसाठी Covaxin च्या वापराला परवानगी

Corona Vaccination: २ ते १८ वयोगटातील मुलांच्या चाचण्यांसाठी Covaxin च्या वापराला परवानगी

DCGI ने भारत बायोटेक लसींची एक्सपायरी डेट १२ महिन्यांपर्यंत वाढवली, स्टॉक होणार रि-लेबल

भारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने कहर केला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान, देशभरात गेल्या १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून सध्या या मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, लहान मुलांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देशात लहान मुलांना कोरोनाची लस कधी देण्यात येणार याच्या प्रतिक्षेत सर्व जण आहेत. या पार्श्वभूमीवर २ ते १८ वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीची शिफारस नुकतीच तज्ज्ञांकडून करण्यात आली होती. दरम्यान ही शिफारस मान्य करण्यात आली आहे. कोरोनाच्या उद्रेकादरम्यान, २ ते १८ वयोगटातील लसीकरणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने (SEC) भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला २ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या फेज २ आणि ३ मानवी क्लिनिकल चाचण्यांसाठी परवानगी दिली असल्याचे सांगण्यात आले आहे.

सध्या हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीची कोवॅक्सिन लस कोरोना विरोधातील लढाईत प्रभावी ठरत आहे. कंपनीकडून ही लस ८१ टक्के प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर भारत बायोटेकची लस प्रभावी असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. त्यामुळे २ ते १८ वयोगटातील लसीकरणाच्या अनुषंगाने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी कोवॅक्सिन लसीचा वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

यापूर्वी भारत बायोटेक कंपनीने २ ते १८ वयोगटातील मुलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी कोवॅक्सिनला मंजूरी देण्याची विनंती केली होती. याबाबत मंगळवारी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (Cdsco) कोरोना विषयक समितीने बैठक घेऊन विचारविनिमय केला. मग त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी कोवॅक्सिनचा वापर करण्याची मंजूरी देण्याची शिफारस समितीने केल्याचे समोर आले.

कोव्हॅक्सिनचा १४ राज्यांना थेट पुरवठा

या कंपनीने केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांप्रमाणे राज्यांना लस पुरवठा सुरू केला आहे. भारत बायोटक कंपनीने राज्यांना १ मे पासून लस पुरवठा सुरू केला आहे. इतर राज्यांकडूनही लस पुरवठय़ाच्या विनंत्या आल्या असून आता दर २४ तासाला उपलब्ध असलेल्या पुरवठय़ावरून राज्यांच्या गरजेनुसार त्यांना लस पुरवठा करण्यात येत आहे. कंपनी आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, गुजरात, जम्मू काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, ओडीसा , तमिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल या राज्यांना लस पुरवठा करत आहे.

First Published on: May 12, 2021 10:08 AM
Exit mobile version