शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांना १ लाख कोटींचा चुना

शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांना १ लाख कोटींचा चुना

(फोटो प्रातिनिधिक आहे)

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक, सेन्सेक्स ४९१ अंकांनी खाली आल्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना तब्बल २ लाख कोटी रुपयांचा चुना लागला आहे. अमेरिका आणि भारतादरम्यान व्यापार युद्ध सुरू होण्याच्या भितीमुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजारापासून लांब रहाणे पसंत केल्याने सेन्सेक्स गडगडल्याचे सांगितले जाते.

सेन्सेक्समध्ये ४९१.२८ अंकांची अथवा १.२५ टक्क्यांची घसरण होऊन तो ३८,९६०.७९ अंकांवर स्थिरावला. शेअर बाजारात झालेल्या मोठ्या विक्रीमुळे मुंबई शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांचे भागभांडवल २,००,२५८.८१ कोटी रुपयांवरून १,५०,०९,३२९.१९ कोटी रुपयांपर्यंत खाली आले.

भारतातून अमेरिकेत निर्यात होणार्‍या वस्तूंवर अमेरिकेने कर वाढवण्याची धमकी दिली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही अमेरिकेतून भारतात आयात होणार्‍या वस्तूंवर कर वाढवण्याचे सुतोवाच केले आहे. दोन देशांदरम्यानच्या या व्यापार युद्घामुळे वित्तीय संस्थांनी शेअर बाजारातून गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम सेन्सेक्सवर झाला. तसेच मान्सून आणि भू-राजकीय घडामोडींनीही शेअर बाजारातील गुंतवणुकीवर परिणाम केला.

मुंबई शेअर बाजारातील बहुतेक सर्वच कंपन्यांचे क्षेत्रीय निर्देशांक सोमवारी खाली आले. त्यातही धातू, ऊर्जा, तेल आणि वायू क्षेत्रातील कंपन्यांवर मोठा परिणाम झाला. त्यांचे निर्देशांक तीन टक्क्यांनी खाली आले. टाटा स्टील, वेदांता लिमिटेड, टाटा मोटर्स, अ‍ॅक्सिस बँक यांना मोठा फटका बसला.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही १५१.१५ अंकांनी अथवा १.२८ टक्क्यांनी खाली आला. तो ११,६७२.१५ अंकांवर स्थिरावला. निफ्टीमध्ये ऑटो क्षेत्रातील कंपन्यांना तब्बल २.८७ टक्क्यांचा फटका बसला.

First Published on: June 18, 2019 4:34 AM
Exit mobile version