केंद्रीय मंत्रिमंडळातील दोन डझन मंत्र्यांवर गंभीर गुन्हे दाखल

केंद्रीय मंत्रिमंडळातील दोन डझन मंत्र्यांवर गंभीर गुन्हे दाखल

केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रातिनिधीक फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार बुधवारी ७ जुलैला पार पडला. एकूण ४३ मंत्र्यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे आता केंद्रीय मंत्र्यांच्या संख्येत वाढ झाली असून आता ही संख्या ७८ वर पोहोचली आहे. मात्र, यापैकी तब्बल ४२ टक्के अर्थात ३३ मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल आहेत. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे २४ जणांविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत. यासंदर्भातील माहिती ADR अर्थात असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स (Association For Democratic Reforms) ने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालातून समोर आली आहे.

एडीआरने प्रसिद्ध केलेल्या अहवालात एकूण ७८ केंद्रीय मंत्र्यांपैकी ३३ मंत्र्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. तसंच, २४ मंत्र्यांविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या सर्व नेत्यांनी निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये माहिती दिली आहे. या माहितीवरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

गृह राज्यमंत्र्यांविरोधातच हत्येचा गुन्हा

केंद्रीय मंत्रिमंळ विस्तार झाल्यानंतर सर्वात तरुण मंत्री ठरलेले ३५ वर्षीय निसित प्रामाणिक यांना केंद्रीय गृहराज्य मंत्रीपद देण्यात आलं आहे. मात्र, त्यांच्या विरोधातच भादंविच्या कलम ३०२ नुसार हत्येचा गुन्हा दाखल असल्याचं एडीआरच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. पश्चिम बंगाल निवडणुकांदरम्यान ज्या कूच बेहेरमध्ये हिंसक घटना घडल्या होत्या, त्या मतदारसंघातून निसित प्रामाणिक खासदार म्हणून निवडून आले आहेत. याशिवाय, जॉन बारला, पंकज चौधरी आणि व्ही. मुरलीधरन या तिघांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा (भादंवि ३०७) गुन्हा दाखल आहे.

मंत्रिमंडळातील ९० टक्के मंत्री कोट्याधीश

एडीआरने दाहीर केलेल्या अहवालात ७८ मंत्र्यांपैकी ७० मंत्री म्हणजेच ९० टक्के मंत्री हे कोट्याधीश आहेत. या मंत्र्यांची प्रत्येकी संपत्ती ही सरासरी १६.२४ कोटी रुपये इतकी आहे. केंद्रातल्या एकूण ४ मंत्र्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये ५० कोटींहून जास्त संपत्ती असल्याचं जाहीर केलं आहे. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे, पियुष गोयल, नारायण राणे आणि राजीव चंद्रशेखर यांचा समावेश आहे.

 

First Published on: July 10, 2021 2:02 PM
Exit mobile version