Coronavirus: विमानातून आलेल्या लोकांच्या अंगावर सॅनिटायझर का नाही फवारलं?

Coronavirus: विमानातून आलेल्या लोकांच्या अंगावर सॅनिटायझर का नाही फवारलं?

कामगारांवर सॅनिटायझनर फवारणीवर जितेंद्र आव्हाड नाराज

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. मात्र त्यामुळे हातावर पोट असलेले अनेक कामगार परराज्यात अडकून बसले. पायी चालत आपल्या घरी निघालेल्या मजूरांसोबत उत्तर प्रदेशच्या बरेली शहरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. देशभरातून या घटनेवर टीका होत असताना राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील नाराजी केली आहे. “विमानातून आलेल्या लोकांच्या अंगावर सॅनिटायझर का नाही फवारलं?”, असा सवाल त्यांनी विचारून आपला संताप व्यक्त केला आहे.

बरेली शहरात परराज्यातून येणाऱ्या काही मजुरांवर आज दुपारी सॅनिटायझर सोल्युशन टाकून सामुहिक आंघोळ घालण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. बरेली पालिका प्रशासनाने महिला आणि पुरुष मजूरांवर पाईपने सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. यानंतर देशभरातून या घटनेच्या विरोधात नाराजीचा सूर सुरु झाला होता. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विट करत आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, “विमानातून आलेल्या लोकांच्या अंगावर का नाही फवारलं हे? माणसं अशी डिसइन्फेक्ट करतात? हे कृत्य अमानवी आहे” तसेच आपल्या आपल्या संतापाला वाट मोकळी करुन देण्यासाठी त्यांनी एका कवितेचे बोलही ट्विट केले आहेत. “कसूर पासपोर्ट का था.. सजा रेशन कार्ड को मिली …” अशा नेमक्या शब्दात त्यांनी आपला असंतोष व्यक्त केला. कोरोनाचा प्रादुर्भाव हा परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे झालेला आहे. देशातील गरिबांमुळे नाही, हे आव्हाड यांना सुचित करायचे होते.

तर शरद पवार यांनी देखील या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. “रोजगाराला वंचित स्थलांतरित मजुरांवर अशा प्रकारे रासायनिक फवारणी करून कोरोना विषाणूच्या शुद्धिकरणाचे प्रयोग उत्तर प्रदेशमध्ये झाले. घरी परतणाऱ्या त्या गरीब मजुरांचा काय दोष? हे दृश्य अमानवी, क्रूर आणि निंदनीय आहे.” असे ट्विट पवार यांनी केले आहे.

First Published on: March 30, 2020 8:48 PM
Exit mobile version