सावरकरांचा मुद्दा सोडून अनेक मुद्दे आहेत; शरद पवारांची काँग्रेस-शिवसेनेत मध्यस्थी

सावरकरांचा मुद्दा सोडून अनेक मुद्दे आहेत; शरद पवारांची काँग्रेस-शिवसेनेत मध्यस्थी

नवी दिल्लीः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरुन सुरु असलेल्या राजकीय कलगीतुऱ्यावर अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी केली आहे. सावरकरांचा मुद्दा सोडून अनेक मुद्दे आपल्यासमोर आहेत. त्यावर चर्चा करा, अशी भूमिका शरद पवार यांनी कॉंग्रेसने आयोजित केलेल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीत माडंली.

शरद पवार म्हणाले, सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काहीही संबंध नाही. सावरकरांना माफीवीर म्हणणे योग्य नाही. सावरकरांचा मुद्दा सोडून अनेक मुद्दे आपल्यासमोर आहेत. त्या मुद्द्यांवर आपण बोलायला हवे.

शरद पवार यांनी भूमिका मांडल्यानंतर राहुल गांधी यांनीही त्याचे समर्थन केले. मी शरद पवार यांच्या मताचा आदर करतो, असे राहुल गांधी यांनी बैठकीत सांगतिले.

‘माझे नाव सावरकर नाही, गांधी आहे. गांधी कोणाचीही माफी मागत नाहीत.’ असे वक्तव्य राहुल गांधी यांनी खासदारकी रद्द झाल्यानंतर केले होते. त्यावरुन सध्या राजकीय घमासान सुरु आहे. मात्र सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथील जाहिर सभेत राहुल गांधी यांना दिला होता. या इशाऱ्यावरुन भाजप व शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. हिम्मत असेल तर महाविकास आघाडीतून बाहेर पडा, असे थेट आवाहन उद्धव ठाकरे यांना करण्यात आले.

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे नौंटकी करत आहेत. त्यांना खरचं सावरकरांबाबत प्रेम असेल. आदर असेल तर त्यांनी कॉंग्रेसला सोडावं. कॉंग्रेस आणि राहुल गांधी रोज सावरकरांचा अपमान करत आहेत. मग दाखवा ना ठाकरी बाणा. सोडा कॉंग्रेसला. बाळासाहेबांनी ठाकरी बाणा दाखवला होता. तुम्हीही दाखवा ठाकरी बाणा, असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

भाजपचे खासदार अनिल बोंडे म्हणाले, सावरकरांबद्दल बोलणाऱ्यांविरोधात बाळासाहेबांनी थेट भूमिका घेतली होती. सावरकरांबद्दल बोलणाऱ्यांना जोड्याने मारा, असे बाळासाहेबांनी सांगितले होते. मग आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत राहुल गांधी यांना जोड्यांनी मारणार का, असा सवाल खासदार बोंडे यांनी उपस्थित केला.

सावरकरांवरुन राहुल गांधी यांना इशारा दिलात. इतका स्वाभिमान असेल तर मग सोडा कॉंग्रेसला. करा ना एक घाव दोन तुकडे. हिम्मत असेल तर व्हा बाजूला कॉंग्रेसपासून, असे आवाहन रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

First Published on: March 28, 2023 11:19 AM
Exit mobile version