चिंताजनक! अवघ्या ११ दिवसांची चिमुरडी कोरोनाच्या विळख्यात; Remdesivir इंजेक्शन देऊन उपचार सुरू

चिंताजनक! अवघ्या ११ दिवसांची चिमुरडी कोरोनाच्या विळख्यात; Remdesivir इंजेक्शन देऊन उपचार सुरू

देशभरात कोरोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा हा देशात वाढत आहे. जीवघेण्या कोरोना व्हायरसने सामान्य माणसांपासून ते बड्या नेत्यांना देखील आपल्या विळख्यात घेतले आहे. अशा परिस्थिती एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. गुजरातमधील सूरत येथे साधारण ११ दिवसांची चिमुरडी तिच्या जन्माच्या पाचव्या दिवसापासून कोरोना व्हायरसशी लढा देत आहे. ही चिमुरडी तिच्या आईच्या संपर्कात आल्याने तिला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचा संशय डॉक्टरांकडून व्यक्त केला जात आहे.

असा घडला प्रकार

अमरोली भागातील एका ३० वर्षीय महिलेला १ एप्रिल रोजी प्रसूतीसाठी डायमंड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच दिवशी त्या महिलेने या चिमुरडीला जन्म दिला. बाळाला जन्माच्या वेळी श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. हे सामान्य असले तरी बऱ्याच बाळांमध्ये अशी समस्या जाणवते. यानंतर या बाळाला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बाळाला जन्म दिल्यानंतर बाळाच्या आईला घरी सोडण्यात आल्याची माहिती बालरोग तज्ञ डॉ अल्पेश सिंधवी यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ एप्रिल पर्यंत चिमुरडीला तिच्या आईच्या दुधाऐवजी फॉर्म्युला फीड देण्यात आले. ५ एप्रिल रोजी जेव्हा बाळाची प्रकृती सुधारली तेव्हा बाळाच्या आईला फोन करून बोलावले गेले. जेणेकरून बाळाची आई बाळाला दूध पाजू शकेल. ६ एप्रिल रोजी या चिमुरडीला श्वास घेण्यास त्रास जाणवत होता, त्यावेळी तिचा एक्स-रे काढण्यात आला.

एक्स-रे काढण्यात आल्यानंतर ६ एप्रिल रोजी असे आढळले की, या चिमुरडीच्या फुफ्फुसात एक मोठा पांढरा डाग दिसला. तो डाग म्हणजे कोरोना संसर्ग पसरला असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर एक अॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली ज्यामध्ये नवजात चिमुरडी पॉझिटिव्ह आढळली. त्यानंतर या चिमुरडीला व्हेंटिलेटरवर ठेवून रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.


First Published on: April 13, 2021 9:08 AM
Exit mobile version