धक्कादायक: लस घेतल्यानंतर दोघांचा मृत्यू?

धक्कादायक: लस घेतल्यानंतर दोघांचा मृत्यू?

देशात मागील १० महिन्यांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे देशात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग जगभरात वेगाने पसरत आहे. कोरोना महामारीवर मात करण्यासाठी जगभरातील तज्ञ डॉक्टरांनी कोरोना लसीचा निर्मिती केली आहे. बहुप्रतिक्षीत कोरोना लसीचे लसीकरणही अनेक देशांत सुरु आहे. भारतातही १६ जानेवारी २०२१ पासून मोहिम राबविण्यात आली आहे. भारतात केलेल्या लसीकरण मोहिमेत लाखो आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. परंतु लस घेतल्यानंतर दोन जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगभरात कोरोना लसीच्या परिणामांबाबत अनेक घटना समोर आल्या असताना आता भारतात कोरोना लस घेतल्यानंतर मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना समोर आली आहे.

कोरोना लस घेतल्यानंतर मृत्यू झालेल्यांपैकी एक तरुण हा उत्तर प्रदेशमधील मोरदाबाद येथील रहिवासी आहे. तर दुसरा तरुण हा कर्नाटकमधील आहे. यो दोघांमधील एका व्यक्तीचा मृत्यू कोरोना लस घेतल्यामुळे झाला नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तर दुसऱ्या व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशमधील ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ह्रदय व रक्तवाहिन्यांसंबधीत असलेल्या आजारामुळे झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. त्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू कोरोना लसीमुळे झाला नसल्याचे डॉक्टरांनी अहवालात स्पष्ट केले आहे. तर कर्नाटकच्या ४३ वर्षिय युवकाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच या व्यक्तीचाही मृत्यू ह्रदय व रक्तवाहिन्यांसंबंधीत आजारामुळे झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देशात १६ जानेवारी सुरु करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत देशातील ३,८१,३०५ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. तर तिसऱ्या दिवसात १,५८,२६६ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. असे आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ.मनोहर अगनानी यांनी म्हटले आहे. कोरोना लस घेतल्यानंतर आतापर्यंत ५८० लोकांवर प्रतिकूल परिणाम दिसून आला असून त्यापैकी ७ जणांना रूग्णालयात दाखल केले आहे.

First Published on: January 18, 2021 10:19 PM
Exit mobile version