बलात्कार करणाऱ्यांना क्लिन चीट; पीडितेची आत्महत्या

बलात्कार करणाऱ्यांना क्लिन चीट; पीडितेची आत्महत्या

प्रातिनिधक फोटो

भारतात महिला सुरक्षित नाहीत यावर अनेकदा चर्चा होत आली आहे. मात्र उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे पोलीस प्रशासनाचा असंवेदनशील चेहरा समोर आला आहे. बलात्कार आरोपीला दोषमुक्त केल्यामुळे एका ३५ वर्षीय पीडितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातील कर्नलगंज भागात घडली आहे. या महिलेवर बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस प्रशासनाने क्लिन चीट दिल्यामुळे पीडिता नैराश्यग्रस्त झाली. त्यानंतर तिने राहत्या घरी फाशी घेऊन आत्महत्या केली.

कर्नलगंज परिसरात राहणाऱ्या या महिलेवर मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात चार जणांनी मिळून वारंवार अत्याचार केले होते. याची तक्रार दाखल केल्यानंतर स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, मात्र त्यानंतर जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाकडे हा तपास सोपविण्यात आला होता. दोन्ही पोलीसांनी या आरोपींना डिसेंबर महिन्यातच दोषमुक्त केले होते. तर इतर दोन आरोपी फरार आहेत.

आपल्याला न्याय मिळावा यासाठी पीडिता आणि तिच्या पतीने मागच्यावर्षी सप्टेंबरमध्ये लखनऊ विधानसभेच्या बाहेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलीस तपासातून निराशा आल्यामुळे त्यांनी हे कृत्य केले होते. गोंडा जिल्हा पोलीसांनी ७ ऑगस्ट रोजी भादंवि कलम ३७६(ड) (सामुहिक बलात्कार) आणि कलम ५०६ अनुसार गुन्हा दाखल केला होता. तसेच काही आयटीशी निगडीत कलम देखली आरोपींवर लावण्यात आले होते.

पीडितेच्या पतीने सांगितले की, “आरोपींनी बलात्कार करुन त्याचा व्हिडिओही बनवला होता. आरोपींना क्लिन चीट दिल्यामुळे माझी पत्नी निराश झाली होती, त्यातूनच तिने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला.”

First Published on: January 15, 2019 4:38 PM
Exit mobile version