…म्हणून तृणमूल काँग्रेसचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार

…म्हणून तृणमूल काँग्रेसचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार

नवी दिल्ली : मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसनेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आणि त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने देशभरात आंदोलन सुरू केले असून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आतापर्यंत स्वत:ला काँग्रेसपासून दूर ठेवणारा तृणमूल काँग्रेस पक्ष देखील सामील झाला होता. यापार्श्वभूमीवर तृणमूलचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमने जे वर्तन केले आहे, आतापर्यंत जी कृती केली आहे, त्यामुळे तसेच भ्रष्टाचार आणि सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग या मुद्द्यांवर विरोधकांची किमान एकजूट झाल्याचे पाहायला मिळत आहे, याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानतो. 2024 साठी हे शुभसंकेत आहेत. विशेषत: येत्या निवडणुकीत याचा परिणाम दिसून येईल, असा दावा ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले.

ज्या प्रकारे संसदेच्या आत, विशेषत: सत्ताधारी मित्रांच्या माध्यमातून सभागृहाचे कामकाज चालू दिले जात नाही. अशावेळी विरोधी पक्षांना संसदेपासून रस्त्यापर्यंत संघर्ष करण्याशिवाय पर्याय उरत नाही. आता सर्वजण 2024च्या आधी विचारसरळीच्या पातळीवर एकत्र येत आहेत. भाजपसाठी आधीच कठीण काळ होता, कारण ते शंभर प्रश्नांचे उत्तर देत नाहीत. ते सरकारी यंत्रणा, सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत आहेत, असे सांगून ते म्हणाले, केवळ विरोधी पक्षाच्या नेत्यांवर अन्याय केला जात आहे. गेल्या काही वर्षांत पाच हजारांहून अधिक खटले नोंदवले गेले आहेत. एकही खटला सत्ताधाऱ्यांवर दाखल झालेला नाही. सीबीआय आणि ईडीच्या खटल्याअंतर्गत दोषसिद्धीचा दर एक दशांश देखील नाही, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

विरोधी पक्षाच्या नेत्यांवरील कारवाईने कळस गाठला आहे. असे कोणते वॉशिंग मशीन आहे की, ज्यामुळे केवळ भाजपातील स्वच्छ चारित्र्याचे आहेत, हे आता सर्वसामान्यांनाही समजू लागले आहे. त्याचबरोबर जे लोक तेथून येथे आले आहेत, त्यांच्याविरोधातील प्रकरणे वाढली आहेत तर, येथून तिकडे गेले आहेत त्यांची प्रकरणे थंड बस्त्यात गेली आहेत. आज जे घडले आहे, ते पाहता मी असे म्हणू शकतो की 2024मध्ये पंतप्रधान आणि त्यांच्या टीमने विरोधकांच्या 100हून अधिक जागा वाढवल्या आहेत, असेही ते म्हणाले.

First Published on: March 27, 2023 7:45 PM
Exit mobile version