सोनिया गांधींची आज पुन्हा ईडी चौकशी, काँग्रेस प्रवक्त्यांकडून भाजपवर निशाणा

सोनिया गांधींची आज पुन्हा ईडी चौकशी, काँग्रेस प्रवक्त्यांकडून भाजपवर निशाणा

नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज पुन्हा ईडी चौकशी होणार आहे. यावरून काँग्रेसने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ता शक्तिसिंह गोहिल यांनी पक्षाच्या कार्यालयात एक पत्रकार परिषद बोलावून भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. गुजरात दंगलीवेळी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने विशेष चौकशी समिती (एसआयटी) नेमली होती. या समितीनेच मोदी यांना समन्स बजावले होते. यामध्ये युपीएची कोणतीही भूमिका नव्हती, असं गोहिल यांनी स्पष्ट केलं. (Sonia gandhi ed inquiry, congress spokeperson targeted to bjp)

पुढे शक्तिसिंह गोहिल म्हणाले की, नरेंद्र मोदी यांची एसआयटी चौकशी सुरू होती तेव्हा भाजपने कोणताही दंगा केला नव्हता. शांततेत ते चौकशीला सामोरे झाले होते, असा दावा भाजपकडून करण्यात येतोय. मात्र हा दावा साफ चुकीचा आहे. त्यावेळी भाजपने युपीए सरकार आणि गुजरातचे तत्कालीन राज्यपाल यांचा विरोध करून त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. भाजपने त्यावेळी तत्कालीन राज्यपाल कमला बेनीवाल यांच्याविरोधात रणशिंग फुंकले होतं.

ते पुढे म्हणाले की, भाजपने एवढंही लक्षात ठेवलं पाहिजे की युपीए सरकारने मोदी किंवा अमित शहा यांना कोणत्याही यंत्रणेमार्फत त्रास दिला नव्हता. तर, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने एसआयटी गठीत करून समन्स बजावले होते. यामध्ये युपीए सरकारची भूमिका नव्हती.

दरम्यान, सोनिया गांधी यांची आज पुन्हा ईडीकडून चौकशी होणार आहे. याविरोधात काँग्रेस पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. शक्तिसिंह गोयल यांनी सांगितलं की, मंगळवारी काँग्रेस नेता आणि कार्यकर्ता शांतता मोर्चा काढणार आहे. तसेच, सोनिया गांधींविरोधात बजावलेल्या समन्सविरोधात राजघाट येथे जाणार आहेत. तेथेही शांततापूर्ण मोर्चा काढून सत्याग्रह करणार आहेत.

First Published on: July 26, 2022 8:12 AM
Exit mobile version