अंदमान-निकोबारमध्ये मान्सून पोहोचला; महाराष्ट्रात होणार ‘या’ दिवशी दाखल

अंदमान-निकोबारमध्ये मान्सून पोहोचला; महाराष्ट्रात होणार ‘या’ दिवशी दाखल

तोक्ते चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीला धडकल्यानंतर सर्वजण मान्सूनच्या प्रतीक्षेत होते. अनेक जणांनी मान्सूनच्या आगमनाला उशीरा होईल, अशी चिंता व्यक्त केली होती. पण दक्षिण-पश्चिम मान्सून अंदमान-निकोबार येथे दाखल झाला आहे, अशी माहिती भारतीय मौसम विज्ञान विभाग (IMD) दिली आहे. त्यामुळे लवकरच मुख्य भूभागात मान्सून पोहोचण्याचे संकेत दिले आहेत. आयएमडीने सांगितले की, ‘२१ मे रोजी नैऋत्य मान्सून बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात, निकोबार बेटे, संपूर्ण दक्षिण अंदमान समुद्र आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात दक्षिण पश्चिम मान्सून आला आहे.’ १ जूनला केरळमध्ये मान्सून दाखल होणार असा अंदाज काही दिवसांपूर्वी आयएमडीने वर्तवला होता. पण आता अंदमान-निकोबारमध्ये मान्सून पोहोचला असल्यामुळे केरळमध्ये मान्सून १ जून अगोदरच म्हणजेच ३१ मे दाखल होण्याचा अंदाज आता आयएमडीने व्यक्त केला आहे.

अंदमानाच्या समुद्रात साधारणः २० ते २१ मे दरम्यान मौसमी वाऱ्याचे आगमन होते. त्यानंतर केरळ किनारपट्टीला मौसमी वारे धडकतात. मात्र तोक्ते चक्रीवादळामुळे मान्सूनच्या आगमनाला उशीरा होईल का? असे प्रश्न उपस्थितीत होत होते. परंतु हवामान खात्याच्या अंदाजाने काही दिवसांपूर्वी या प्रश्नाला उत्तर दिले आहे. मान्सून नेहमीच्या वेळेप्रमाणे अंदमानात दाखल होणार आणि आज तो अंदमान-निकोबारच्या काही बेटावर दाखल झाला आहे.

दरम्यान हवामान खात्याने २१ मेपासून २३ ते २५ मे दरम्यान दक्षिण पूर्ण बंगालच्या उपसागरात आणि अंदमान समुद्रात मच्छिमारांनी जाऊ नये, असा सल्ला दिला आहे. केरळ मध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर १० जूनपर्यंत तळकोकणात दाखल होऊ शकतो आणि उर्वरित महाराष्ट्रात १५ ते २० जूनदरम्यान पावसाच्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

First Published on: May 21, 2021 6:40 PM
Exit mobile version