IPL टीव्हीवरही चालेल; स्टेडियम विसरा – क्रीडामंत्री किरण रिजिजू

IPL टीव्हीवरही चालेल; स्टेडियम विसरा – क्रीडामंत्री किरण रिजिजू

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्याचे परिणाम देखील इथल्या अनेक गोष्टींवर होताना पाहायला मिळत आहेत. देशातली सर्वात लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं, त्या आयपीएलला कोरोनामुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं आहे. त्यासोबतच, येत्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेवर देखील कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे आता मोठी गर्दी खेचणाऱ्या अशा स्पर्धांचं स्वरूप बदलण्याच्या दिशेने चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. त्यामुळे भविष्यात या स्पर्धांचं स्वरूप बदललेलं पाहायला मिळू शकतं.

काय म्हणाले किरण रिजिजू?

आजतकच्या एका कार्यक्रमात बोलताना किरण रिजिजू म्हणाले, ‘कोरोना व्हायरसने लोकांचं राहणीमानच बदलून टाकलं आहे. आता आपण पहिल्यासारखं नाही राहू शकत. आधीसारख्या खचाखच भरलेल्या स्टेडियमची कल्पना आता आपण नाही करू शकत. आपल्याला आता नियम पाळावे लागतील आणि खेळाच्या नव्या पद्धतींवर विचार करावा लागेल. आयपीएल खूप लोकप्रिय आहे. टीव्हीवरून देखील आयपीएलला रेव्हेन्यू मिळतो’. दरम्यान, ‘क्रीडा विश्वाशी अनेक लोकांचा रोजगार जोडला गेला आहे. नोकरी, क्रीडासाहित्य आणि इतर असंख्य मार्गांनी लोकं या क्षेत्राशी जोडले गेले आहेत. त्यामुळे खेळ थांबल्यामुळे या लोकांचं मोठं नुकसान होत आहे’, असं देखील रिजिजू म्हणाले.

लवकरच खेळाडूंसाठी सराव शिबिरं!

दरम्यान, यावेळी किरण रिजिजूंनी खेळाडूंसाठीच्या सराव शिबिरांसंदर्भात माहिती दिली. ‘लवकरच खेळाडू आणि प्रशिक्षकांसाठी सराव शिबिरं आयोजित केली जातील. हॉकीसारख्या ग्रुप खेळांसाठी सरावादरम्यान मेडिकल एक्सपर्ट देखील हजर असतील. सर्व खेळाडूंना एकाच वेळी परवानगी देणं शक्य होणार नाही. पण ऑलिंपिक, वर्ल्ड चॅम्पियनशीपसारख्या खेळांची तयारी करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्याने सराव शिबिरात घेतलं जाईल’, असं ते म्हणाले.

First Published on: May 11, 2020 1:14 PM
Exit mobile version