‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला मिळणार रेल्वे आणि हवाई कनेक्टिव्हिटी

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला मिळणार रेल्वे आणि हवाई कनेक्टिव्हिटी

जगातील सर्वात उंच आणि भव्य स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळ आत्ता रेल्वे रूळ आणि विमानतळ येणार आहे.

जगातील सर्वात उंच आणि भव्य स्टॅच्यू ऑफ युनिटीचे ३१ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आता शुक्रवारी गुजरात सरकारने घोषित केले आहे की नर्मदा जिल्ह्यातील केवाडिया गावाजवळ असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला लवकरच हवाई आणि रेल्वेची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) आणि रेल्वे मंडळाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिल्ली येथे भेट दिली आणि त्यानंतर एका परिपत्रकातून त्यांनी हे कळवले आहे.

केवाडियावरून २३ किमीवर विमानतळ

एएआयचे अध्यक्ष गुरूप्रसाद मोहपात्रा यांना भेटल्यावर रुपानी यांनी असे सांगितले की, ‘नर्मदा जिल्ह्यात राजपीपला शहरात लवकरच एक विमानतळ येणार आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी हे विमानतळ उभारण्यात येणार आहे. राजपीपला हे केवाडियावरून २३ कि.मी.च्या अंतरावर आहे’. त्या प्रकाशनात त्यांनी असे ही सांगितले की, ‘एएआय राजपीपला, ढोलेरा आणि राजकोट येथे विमानतळ बांधण्यास राज्य सरकारला मदत करणार आहे’.

रूपानी यांनी रेल्वे मंडळाचे अध्यक्ष अश्वानी लोहानी यांच्याशी गुजरातमधील रेल्वे कनेक्टिव्हिटी बाबत चर्चा केली. त्या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी केवाडियापर्यंत रेल्वे ट्रॅक नेणार असे सांगितले. या भेटीमध्ये त्यांनी केवाडियापर्यंतचे रेल्वे रुळाचे काम जलदपणे करण्यात येणार आहे, असे सांगितले.

First Published on: November 17, 2018 6:22 PM
Exit mobile version