कार्टोसॅट-३ उपग्रहाचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण

कार्टोसॅट-३ उपग्रहाचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने बुधवारी इतिहास रचला. इस्रोने १६२५ किलो वजनाच्या कार्टोसॅट-३ उपग्रहासह अमेरिकेच्या १३ नॅनो उपग्रहांचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले. इस्रोच्या पीएसएलव्ही सी-४७ या प्रक्षेपकाच्या माध्यमातून हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतिश धवन स्पेस सेंटर लाँच पॅडहून हे प्रक्षेपण करण्यात आले.

पृथ्वीची छायाचित्रे काढण्यासाठी तसेच नकाशा निर्मितीसाठी कार्टोसॅट-३ हा उपग्रह उपयुक्त ठरणार आहे. ‘फ्लोक-४ पी’ हे १२ लघु उपग्रह असून, एक ‘एमईएसएचबीईडी’ हा लघु उपग्रह आहे. ‘कार्टोसॅट-३’ उपग्रह अवकाशात पाच वर्षे कार्यरत राहणार आहे. कार्टोसॅट-३ उपग्रहामध्ये हाय रिझोल्युशनची छायाचित्रे घेण्याची क्षमता आहे. या खास क्षणी इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यावेळी श्रीहरीकोटा मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये उपस्थित होते.

‘कार्टोसॅट-३’ भारताचा डोळा असल्याचे सांगितले जात आहे. कारण याच्या मदतीने मोठ्या प्रमाणात मॅपिंग करणे शक्य होणार आहे. याचा उपयोग नगर नियोजन, पायाभूत सुविधा विकास, किनारपट्टी विकासात होणार आहे.‘कार्टोसॅट-३’हा प्रगत उपग्रह असून त्याच्या मदतीने अधिक सुस्पष्ट छायाचित्रे घेता येतील. ५०९ किमीच्या कक्षेत तो पाठवण्यात आला असून पीएसएलव्ही सी ४७ प्रक्षेपकाचे हे २१ वे उड्डाण आहे.

पीएसएलव्ही एक्सएल या नव्या प्रक्षेपकात सहा घन इंधन मोटारी आहेत. पीएसएलव्ही सी ४७ आणखी १३ व्यावसायिक नॅनो उपग्रह घेऊन झेपावले आहेत. ते सर्व अमेरिकेचे आहेत. श्रीहरीकोटा येथून होणारे हे ७४ वे उड्डाण आहे.

First Published on: November 28, 2019 6:45 AM
Exit mobile version