Sudha Murty : आता खासदार सुधा मूर्ती; खासदारकीची घेतली शपथ

Sudha Murty : आता खासदार सुधा मूर्ती; खासदारकीची घेतली शपथ

नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका सुधा मूर्ती यांनी गुरुवारी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी त्यांना संसद भवनातील त्यांच्या चेंबरमध्ये शपथ दिली. यावेळी सभागृह नेते पीयूष गोयल उपस्थित होते. सुधा मूर्ती यांचे पती नारायण मूर्ती देखील यावेळी उपस्थित होते. इन्फोसिस फाऊंडेशनच्या माजी अध्यक्षा सुधा मूर्ती (७३) यांची गेल्या शुक्रवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनी राज्यसभेवर नामांकन करण्यात आले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील ख्यातनाम उद्योजिका, लेखिका, समाजसेविका सुधा मूर्ती (वय ७३ वर्षे) यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड केली आहे. त्याबद्दल मूर्ती यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी अभिनंदन केले होते. सुधा मूर्ती या इन्फोसिस कंपनीचे सहसंस्थापक एन.आर. नारायण यांच्या पत्नी होत. आपली साधी राहणी आणि उच्च विचारसरणीमुळे त्या मुलांमध्ये देखील लोकप्रिय आहेत. उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी गुरुवारी त्यांना राज्यसभा खासदारीकीची शपथ दिली. सुधा मूर्ती यांनी खासदारकीसाठी पद तसेच गोपनीयतेची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर सुधा मूर्ती यांनी उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्यासोबत संवाद साधला.

राज्यसभेवर नामनियुक्त सदस्य म्हणून निवड होणे आणि त्याची घोषणा आंतरराष्ट्रीय महिलादिनी होणे हे माझ्यासाठी आश्चर्याचे दोन धक्के आहेत, अशी प्रतिक्रिया सुधा मूर्ती यांनी दिली. राज्यसभेवर निवड होईल असा विचारही मी कधी केला नव्हता, असेही त्या म्हणाल्या.

कोण आहेत सुधा मूर्ती?

कन्नड आणि इंग्रजी साहित्यातील योगदानासाठी प्रसिद्ध असलेल्या सुधा मूर्ती यांना साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार, पद्मश्री (2006) आणि पद्मभूषण (2023) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सुधा मूर्ती या टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनी लिमिटेड (TELCO) या व्यावसायिक वाहन निर्मिती कंपनीमध्ये काम करणाऱ्या पहिल्या महिला अभियंता होत्या. सुधा मूर्ती यांनी पती नारायण मूर्ती याना आपत्कालीन निधीतून Infosys सुरू करण्यासाठी 10,000 रुपये दिले, ज्याचे बाजार भांडवल आज 80 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. त्यांची मुलगी अक्षताचा विवाह ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी झाला आहे. सुधा मूर्ती यांनी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्याचा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे अभिनंदन केले होते. स्त्रीशक्तीने देशाचे भविष्य घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, अशा शब्दात मोदींनी त्यांच्या निवडीचे कौतुकही केले होते.

 

First Published on: March 14, 2024 4:37 PM
Exit mobile version