उपचारांसाठी चिमुकली दिली नागाच्या तोंडी, मुलीचा दुर्दैवी मृत्यू

उपचारांसाठी चिमुकली दिली नागाच्या तोंडी, मुलीचा दुर्दैवी मृत्यू

नाग

असं म्हणतात की ‘श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी’. अंधश्रद्धेमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रसंगी काहींचे जीवही गेले आहेत. नरबळीसारख्या अघोरी प्रथा आजही देशात अस्तित्वात आहेत. देश २१व्या शतकात जरी वाटचाल करत असला, तरी देशातल्या या गोष्टी आपण अजूनही मागच्याच शतकात असल्याचं सिद्ध करत आहेत. अशीच एक घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे. अशाच अंधश्रद्धेपोटी एका ५ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

म्हणे साप करेल चिमुकलीवर उपचार!

छत्तीसगडमधल्या राजनांदगाव परिसरामध्ये हा प्रकार घडला आहे. बिल्लू राम मरकम नावाचा एक गारूडा त्याच्या टोपलीत नाग घेऊन फिरत होता. एका घरासमोर तो गेला असता तिथली एक ५ वर्षांची चिमुरडी आजारी असल्याचं त्याला समजलं. त्या मुलीवर आपण उपचार करू, असं सांगत त्याने त्या मुलीच्या आई-वडिलांना गळ घातली. मुलगी बरी होईल यासाठी बिल्लूच्या भंपकपणाला बळी पडून अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत मुलीवर उपचार करायची तयारी दाखवली.

सापाला मुलीच्या गळ्याभोवती गुंडाळलं

बिल्लूची उपचारांची पद्धत अघोरी होती. त्याने त्या ५ वर्षांच्या चिमुकली समोर फणा काढलेल्या नागाला ठेवलं. हा नाग विषारी नसल्याचं त्यानं घरच्या मंडळींना सांगितलं. मग त्यानं त्या नागाला मुलीच्या गळ्याला गुंडाळलं. एवढं सगळं होत असताना मुलीचे आई-वडील फक्त पाहात होते. बिल्लू मंत्र म्हणत असताना अचानक त्या नागानं मुलीला चावा घेतला. हळूहळू मुलीची प्रकृती खालावत गेल्यावर मात्र आई-वडिलांची घाबरगुंडी उडाली. अखेर त्यांनी मुलीला उचलून दवाखान्यात नेलं. पण त्याआधीच मुलीचा मृत्यू झाला होता. हा सगळा प्रकार झाल्यानंतर बिल्लूला स्थानिकांनी पोलिसांच्या हवाली केलं.

First Published on: October 17, 2018 10:46 PM
Exit mobile version