लग्नाचे खोटे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवणं म्हणजे बलात्कारच – सुप्रीम कोर्ट

लग्नाचे खोटे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवणं म्हणजे बलात्कारच – सुप्रीम कोर्ट

महिलेला लग्नाचे खोटे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवणं म्हणजे हा बलात्काराचा गुन्हा आहे, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे आता महिलांची फसवणूक करणाऱ्या घटनांना थोड्याफार प्रमाणात आळा बसणार आहे. काही पुरुषांकडून महिलांशी खोटे बोलून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवले जाते. त्यांच्या या प्रेमाच्या आमिषामध्ये फक्त वासनेची भूक सामावलेली असते. ही भूक शमल्यानंतर महिलेला लग्नासाठी नकार दिला जातो. त्यामुळे पीडित महिलेची मनस्थिती खालवते. तिच्या आत्मन्मानावर ठेच पडते आणि तिच्या मनावर खोलवर आघात होतात. त्यामुळे आता अशाप्रकारे महिलांची कुणी फसवणूक केली तर त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होणार आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

छत्तीसगढमधील पीडित महिलेने एका डॉक्टराच्या विरोधात याचिका दाखल केली होती. पीडित महिला आणि डॉक्टर यांच्यात प्रेमसंबंध होते. ते परस्परांना २००९ पासून ओळखत होते. डॉक्टरने महिलेला लग्नाचे आश्वासन दिले होते. डॉक्टर आणि महिला दोघांच्या घरी त्यांच्या प्रेमप्रकरणाविषयी माहिती होती. डॉक्टरने महिलेच्या कुटुंबियांनाही लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, डॉक्टरने दुसऱ्याच कुणाशी लग्न केले. त्यामुळे पीडित महिलेने कोर्टात धाव घेतली होती. पीडितेने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. लग्नाचे आमीष दाखवून पीडितेशी शरीरसंबंध म्हणजे बलात्कारच, असा निर्णय सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश एल. नागेश्वर राव आणि एमआर शाह यांच्या खंडपीठाने दिला आहे. अशा प्रकारच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.

First Published on: April 16, 2019 12:03 PM
Exit mobile version