धक्कादायक! ‘मासिक पाळीदरम्यान जेवण बनवलं तर कुत्रीचा जन्म मिळतो’!

धक्कादायक! ‘मासिक पाळीदरम्यान जेवण बनवलं तर कुत्रीचा जन्म मिळतो’!

मासिक पाळी सुरू आहे की नाही, हे तपासण्यासाठी ६८ मुलींना कपडे काढायला लावणारा प्रकार अहमदाबादमधल्या भुज संस्थेत घडल्यानंतर त्यावर मोठा गदारोळ उठला. त्यासंदर्भात चौकशी सुरू झाली असून आता असाच अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथल्या स्वामीनारायण भुज मंदिराचे (नर नारायण देव गढी) स्वामी कृष्णस्वरूप दास यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये ते उपस्थितांना अजब आणि भयानक सल्ले देताना दिसत आहेत. अहमदाबाद मिररने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहेत. ‘मासिक पाळी सुरू असताना जेवण बनवणाऱ्या महिलेला पुढचा जन्म कुत्रीचा मिळतो’, असं धक्कादायक विधान हे स्वामी करत आहेत.

सध्या महाराष्ट्रात इंदुरीकर महाराजांनी केलेल्या गर्भलिंगनिदानासंदर्भातल्या विधानावरून खळबळ उडाली असतानाच आता गुजरातमधल्या या प्रकारामुळे आध्यात्मिक मार्गदर्शन करणाऱ्या गुरुंकडून केली जाणारी वक्तव्य पुन्हा चर्चेत आली आहेत.

काय म्हणाले स्वामी?

स्वामी कृष्णस्वरूप दास या व्हिडिओमध्ये भुजमधल्या एका रात्रीसभेमध्ये बोलताना दिसत आहेत. दास बोलताना असा दावा करत आहेत की, ‘जर तुम्ही मासिक पाळी सुरू असलेल्या स्त्रीच्या हातचं जेवण जेवलात, तर तुम्हाला पुढचा जन्म बैलाचा येईल. आणि जर महिलांनी मासिक पाळी सुरू असताना जेवण बनवलं, तर त्यांना पुढचा जन्म कुत्रीचा येईल!’ वर स्वामीजी असंही म्हणतायत, की तुम्हाला जे वाटेल ते वाटू देत, पण हे नियम शास्त्रांमध्ये नमूद करून ठेवण्यात आले आहेत’. मात्र असं म्हणताना कोणत्या शास्त्रात कुठे हे नियम असे सांगितले आहेत, ते मात्र स्वामीजी सांगत नाहीयेत.

एकीकडे इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यामुळे गोंधळ सुरू झालेला असतानाच आता स्वामी कृष्णस्वरूप दास यांच्या या वक्तव्यावर नवी चर्चा सुरू झाली आहे. ज्या प्रकारे इंदुरीकर महाराजांविरोधात कारवाईची तयारी करण्यात आली होती, त्याच प्रकारे कृष्णस्वरूप दास यांच्याविरोधात देखील कारवाई होईल का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.


हेही वाचा – मासिक पाळी आणि रुढीवादी समाज!
First Published on: February 18, 2020 5:19 PM
Exit mobile version