Video: तबलिगी मर्कझमध्ये सहभागी संशयित कोरोनाबाधिताचा आत्महत्येचा प्रयत्न

Video: तबलिगी मर्कझमध्ये सहभागी संशयित कोरोनाबाधिताचा आत्महत्येचा प्रयत्न

दिल्लीतील निझामुद्दीन येथील तबलिगी मर्कझमध्ये सहभागी झालेला आणि कोरोना संशयित असलेल्या रुग्णाने आज राजीव गांधी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला. हॉस्पिटलच्या सहाव्या मजल्यावरील आयसोलेशन वॉर्डमधून रुग्णाने तब्बल दहा मिनिटे उडी मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच धावपळ झाली. काही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी खाली जाऊन रुग्णाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एका डॉक्टरांनी आयसोलेशन वॉर्डात घुसल्यानंतर रुग्ण खिडकीतून पुन्हा माघारी फिरला.

हा रुग्ण मंगळवारी या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेला आहे. त्याची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच मनोचिकित्सकाकडून त्याचे समुपदेशन केले जात आहे. आज दुपारी १२.३० च्या दरम्यान हा रुग्ण खिडकीवर येऊन ओरडायला लागला होता. तसेच तो वारंवार खाली उडी मारण्याची धमकी देत होता. त्याचा आवाज ऐकल्यानंतर इतर ठिकाणचे कर्मचारी देखील खाली धावले होते. सर्वांनी त्याला आज जाण्याची विनंती केली, मात्र तो काही ऐकायला तयार नव्हता.

ही गडबड सुरु असताना अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी पोहोचले. डॉक्टरांनीही त्याच्या रुममध्ये जाऊन त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आम्ही रुग्णांवर उपचार करु शकतो, मात्र अग्निशमन दला सारखे एखाद्या आत्महत्या करणाऱ्याचा जीव वाचवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया येथील डॉक्टरांनी दिली. कोरोना बाधित रुग्णांना वेंटिलेशनची गरज असते त्यामुळे हॉस्पिटलच्या खिडक्या उघड्या ठेवाव्या लागतात, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

First Published on: April 1, 2020 10:06 PM
Exit mobile version