तालिबान्यांचा यू टर्न, अफगाणि इंजिनियर, डॉक्टरांना देश सोडण्यास मनाई

अफगाणिस्तानवर १५ ऑगस्टला तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर देशात अफरातफरीचे वातावरण आहे. अफगाणिस्तानात नोकरी आणि व्यवसायासाठी गेलेल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी अनेक देशांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केली आहेत. पण याच रेस्कयू ऑपरेशनच्या नावाखाली अफगाणि सामान्य नागरिकांबरोबरच उच्चशिक्षित अफगाणि डॉक्टर, इंजिनियर, शिक्षकही देश सोडून जात आहेत. यामुळे तालिबानी चिडले असून आता स्थानिकांना देश सोडून जाण्यास तालिबानींनी बंदी घातली आहे.

विमानतळ परिसरावरही तालिबानी लक्ष ठेवून असून देशाच्या सीमारेषाही सील करण्यात आल्या आहेत. जेणेकरून कोणीही रस्तेमार्गावरून देशाबाहेर जाऊ शकणार नाही. तालिबान्यांचा अन्याय ज्यांनी सहन केलेला आहे ते अफगाणि नागरिक आता अफगाणिस्तानात राहू इच्छित नाहीत. यामुळे मिळेल त्या देशाच्या विमानात बसून ते देश सोडत आहेत. विशेष म्हणजे यात उच्चशिक्षित डॉक्टर, इंजिनियर, शिक्षकांची संख्या अधिक आहे.

यामुळे तालिबानी चिडले असून त्यांनी अमेरिकेसह इतर देशांना ३१ ऑगस्टच्या आत तुमच्या नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर न्या असे ठणकावून सांगितले आहे. तसेच अफगाणिस्तानातील स्थानिकांना फूस लावणं थांबवा. जर आमचे डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक देश सोडून गेले तर आमच्यावर उपचार कोण करणार, आमच्या कंपनीमध्ये काम कोण करणार, मुलांना कोण शिकवणार असा सवाल तालिबान्यांनी केला आहे. यामुळे देश सोडून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या अफगाणि नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

First Published on: August 25, 2021 4:59 PM
Exit mobile version