याला म्हणतात जुगाड; EVM मशीन पोहोचवण्यासाठी गाढवाचा वापर

याला म्हणतात जुगाड; EVM मशीन पोहोचवण्यासाठी गाढवाचा वापर

प्रातिनिधिक छायाचित्र (फोटो साभार - Deccan Chronicle)

देशभरात जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव सुरु आहे. सतराव्या लोकसभेचे सरकार निवडण्यासाठी देशातील कोट्यवधी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. निवडणूक आयोग देखील लोकांनी मतदान करावे, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. ईव्हीएम मशीन आणि मतदान प्रक्रियेचे साहित्य मतदान केंद्रावर ने-आण करणाऱ्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. मात्र अशी अद्ययावत यंत्रणा देशभरात पुरवता येत नाही. मग तिथे निवडणूक आयोगाला करावा लागतो ‘जुगाड’. असा एक भन्नाट जुगाड तामिळनाडूतील काही जिल्ह्यात आयोगाने केला आहे.

धर्मपूरी येथील पेन्नाग्राम, कोट्टूर शहरात तर उंच डोंगर असल्यामुळे निवडणूक आयोगाला तिथे पोहोचण्यास अडचण निर्माण होते. अशावेळी निवडणूक आयोगाचे अधिकारी हे आव्हान पेलण्यासाठी गाढव आणि खेचर यांचा वापर करत आहेत. छोट्या गोणीत ईव्हीएम मशीन व्यवस्थित बांधून ती गाढवावर लादली जाते. तर काही सामान निवडणूक अधिकारी स्वतः डोक्यावर घेतात. हे सर्व सामान घेऊन मतदान केंद्रावर जाण्यासाठी ९ ते ११ किलोमिटरची पायपीट करावी लागते.

तामिळनाडू राज्यातील धर्मपूरी, दिण्डुक्कल, ईरोडु, नामक्कल आणि तेनी जिल्ह्यांचा काही भाग हा डोंगराळ प्रदेशाचा आहे. या भागात जाण्यासाठी पुरेशे रस्ते नसल्यामुळे मोटार वाहन नेणे शक्य नाही. निवडणूक म्हटली की गाड्यांचा लवाजमा आलाच. मात्र दूर दूरवर असलेल्या गावांमध्ये ही यंत्रणा वेळेत पोहोचवता येत नाही. या मतदान केंद्रावर मतदारांची संख्या ही ३०० ते १,१०० दरम्यान आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र (फोटो साभार – Deccan Chronicle)

तुम्ही न्यूटन सिनेमा पाहिला आहे का? त्यात न्यूटन कुमार म्हणजेच राजकुमार राव मतदान व्हावे, यासाठी कसा प्रयत्नशील असतो. नक्षली भागातही मतदान व्हावे, अशी त्याची इच्छा असते. तामिळनाडूच्या वेल्लक्कवी येथील बराचसा भाग घनदाट जंगलाचा आहे. निवडणूक अधिकाऱ्यांना तिथे पोहोचण्यासाठी नक्षलविरोधी पथकाचा वापर करावा लागतो.

First Published on: April 19, 2019 10:19 AM
Exit mobile version