नवीन वर्षात एअर इंडियात दाखल होणार १२ विमाने; टाटा समूहाची घोषणा

नवीन वर्षात एअर इंडियात दाखल होणार १२ विमाने; टाटा समूहाची घोषणा

Air India Handover: एअर इंडियाची मालकी आजपासून टाटा समूहाच्या हाती

नवी दिल्ला: नवीन वर्षात एअर इंडियामध्ये नवीन १२ विमाने दाखल होणार आहेत. पहिल्या सहा महिन्यात ही विमाने दाखल होणार आहेत. यामध्ये A320 नियो व बोइंग 777-300ER या विमानांचा समावेश आहे.

डबघाईला गेलेल्या एअर इंडियाची जबाबदारी टाटा समूहाने घेतली आहे. टाटा समूहाने एअर इंडियासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. सोमवारी टाटा समूहाने नवीन विमानांची घोषणा केली. नवीन १२ विमानांचा वापर हा जवळ, लांब व मध्यम अंतराच्या प्रवासाठी याचा वापर केला जाणार आहे. तसेच जानेवारी २०२३ पासून  ४२ नवीन विमाने फ्लीटला जोडली जाणार आहेत.

नवीन विमानांमध्ये बोइंग 777-300ER ची सहा मोठी विमाने असणार आहेत. देशातील मोठ्या शहरांना आंतरराष्ट्रीय विमान मार्गांशी जोडण्यासाठी या विमानांचा वापर होणार आहे. या विमानांमध्ये फर्स्ट क्लास, बिजनेस, प्रिमिअम इकाॅनाॅमिक व इकाॅनाॅमिक क्लास असेल. काही दिवसांपूर्वी टाटा समूहाने देशात प्रिमिअम इकाॅनाॅमिक क्लासची सुरुवात करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार नवीन विमानांमध्ये ही व्यवस्था असणार आहे. मात्र यामध्ये छोट्या आकारच्या सहा ए३२० एअरबस असणार नाहीत, असे टाटा समूहाने स्पष्ट केले आहे.

A320 नियो ही छोट्या आकाराची विमानेही टाटा समूह घेणार आहे. ज्यांचा वापर देशातंर्गत हवाई उड्डाणासाठी केला जाणार आहे. जवळपासच्या देशात जाण्यासाठीदेखील याचा वापर होणार आहे, असे टाटा समूहाने स्पष्ट केले.

नवीन विमाने घेण्यासोबतच सक्षम विमानांची दुरुस्ती करण्याचे काम टाटा समूह करत आहे. आतापर्यंत १९ विमानांची दुरूस्ती करण्यात आली आहे. भविष्यात अजून काही मोठ्या विमानांची दुरुस्ती केली जाणार असल्याचे टाटा समूहाने सांगितले आहे.

एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडेच होती. केंद्र सरकारने नंतर याचा ताबा घेतला. गेल्या काही वर्षांपासून एअर इंडिया आर्थिक विवंचनेत अडकली होती. केंद्र सरकारने एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे टाटा समूहाने पुन्हा एअर इंडियाची धुरा आपल्या हाती घेतली.

First Published on: December 5, 2022 7:24 PM
Exit mobile version