अन् आमदार चक्क स्मशानात झोपले…!

अन् आमदार चक्क स्मशानात झोपले…!

स्मशानात झोपले टीडीपीचे आमदार निमलला राम नायडू (सौजन्य - एसटी)

स्मशानभूमी म्हटलं की अनेकांच्या भुवया उंचावतात. तिथे काम करणं तर सोडा, कोणाच्या अंत्यदर्शनासाठीही काही लोकं जाण्यास घाबरतात. अशातच एका आमदाराने कामगारांच्या मनातील भीती घालवण्यासाठी स्मशानभूमीत रात्र घालवली आहे. आंध्र प्रदेशातील तेलगू देसम पार्टी (टीडीपी)चे आमदार निमलला राम नायडू यांनी गोदावरी जिल्ह्यातील एका स्मशानभूमीत अख्खी रात्र घालवली आहे. इतकेच नव्हे तर रात्रीचे जेवणही त्यांनी तिथेच केले आहे. त्यानंतर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून कामगारांची भीतीच पळून गेल्याच मत आमदाराने व्यक्त केलं आहे. पलाकोलेचे आमदार निमलला राम नायडू यांच्या या भन्नाट युक्तीची चर्चा सध्या आंध्र प्रदेशात सुरू आहे.

गोदावरी जिल्ह्यातील ‘हिंदू स्मशान वाटिका’ या स्मशानभूमीचे पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. येथील कामागारांचे कामकाज खुपच धिम्या गतीने सुरू आहे. स्मशानात काम करण्याची भीती घालवण्यासाठीच येथील स्थानिक आमदाराने शुक्रवारची रात्र येथे घालवली. रात्रीचे जेवणही त्यांनी याच ठिकाणी केले आणि सकाळी उठून त्यांनी पुन्हा स्मशानात जाऊन जागेची पाहणी केला.

कामगाराच्या मनात प्रचंड भीती आहे. त्यामुळे स्मशानातील कामाला विलंब होत आहे. त्यांच्या मनातील भीती जाण्यासाठी मी हा प्रयोग केला. मी रात्रभर स्मशानात झोपलो. आणखी २-३ दिवस येथेच झोपयला येणार आहे. माझ्या या प्रयोगानंतर शनिवारी जवळपास ५० कामगार कामावर परत आले आहेत. यानंतर पुनर्बांधणीचे काम आता जलद गतीने पूर्ण होईल, अशी आशा आहे.
– निमलला राम नायडू, आमदार, टीडीपी

दिवसभर स्मशानात मृतदेहाला अग्नी देण्याची प्रक्रिया सुरू असते. कामगार जेव्हा मातीमध्ये खोदकाम करतात, तेव्हा त्यांना अर्धवट जळालेले अवशेष दिसतात. त्यामुळे कामगार घाबरतात. मेलेल्या लोकांची आत्मा त्यांना त्रास देईल, अशी भीती त्यांच्या मनात बसली आहे. याच कारणामुळे आमदार नायडू यांनी स्मशानात रात्र घालवण्याचा निर्णय घेतला होता.

First Published on: June 24, 2018 5:31 PM
Exit mobile version